मेट्रोचे प्रवासी ठराविक स्थानापर्यंत तातडीने पोहोचणार; नागपूर मेट्रोच्या शेअर ऑटो रिक्षा सेवेचे उद्घाटन
By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 3, 2024 21:07 IST2024-02-03T21:07:30+5:302024-02-03T21:07:50+5:30
ही सेवा शहरातील विविध ऑटो रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुरू करण्यात आली असून नागपूरकरांसाठी अतिशय लाभदायक ठरेल आणि टप्प्याटप्प्याने शहरात इतरत्र सुरू होईल.

मेट्रोचे प्रवासी ठराविक स्थानापर्यंत तातडीने पोहोचणार; नागपूर मेट्रोच्या शेअर ऑटो रिक्षा सेवेचे उद्घाटन
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने प्रवाशांना मेट्रो स्टेशनपर्यंत आणि मेट्रो स्टेशनपासून ठराविक स्थानापर्यंत (फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) पोहचविण्यासाठी शेअर ऑटोरिक्षा सेवेचे औपचारिक उद्घाटन कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
याप्रसंगी महामेट्रोचे संचालक (नियोजन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) हर्षल डाके, नागपूर ऑटो संघटनेचे अध्यक्ष तायवाडे, महामेट्रो अधिकारी आणि ऑटो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शेअर ऑटोरिक्षा सेवा टप्प्याटप्प्याने मेट्रोच्या अन्य स्थानकांवरून सुरू होणार आहे. या सेवेचे दर निश्चित आहेत. शेअर ऑटोरिक्षा सेवेचे दर विभागीय वाहतूक प्राधिकरणाने मंजूर केले आहेत. ही सेवा नागपूरकरांसाठी एक मोठा गेम चेंजर ठरेल आणि फीडर सेवेने शहरातील महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील.
ही सेवा शहरातील विविध ऑटो रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुरू करण्यात आली असून नागपूरकरांसाठी अतिशय लाभदायक ठरेल आणि टप्प्याटप्प्याने शहरात इतरत्र सुरू होईल. या सेवेमुळे प्रवासी ठराविक स्थानापर्यंत तातडीने पोहोचणार असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. या सेवेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर पोलीस वाहतूक शाखा आणि ऑटो रिक्षा संघटनांनी मदत केली. सेवा सुरू झाल्याचा लाभ कस्तुरचंद पार्क स्टेशनवरून बाहेर आलेल्या प्रवाशांनी घेतला.