गुजरात ते नेपाळपर्यंत गुंजणार ‘बेटी बचाओ’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:10 IST2018-08-01T00:09:06+5:302018-08-01T00:10:58+5:30
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या प्रवासादरम्यान वृक्षारोपणाचा संकल्पही तिने केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने पाच हजार झाडे लावली असून १० हजार झाडे लावण्याचा तिचा प्रयत्न आहे. हरियाणा येथील रेवाडी जिल्ह्यातील छोट्याशा गुर्जर माजरी गावांतील सुनिता चोकन आपल्या ४५ दिवसांच्या सायकल यात्रेवर आहे. मध्य प्रदेश मार्गाने मंगळवारी ती नागपुरात पोहचली. रोटरी क्लबच्या मदतीने तिने पत्रकारांशी संवाद साधला.

गुजरात ते नेपाळपर्यंत गुंजणार ‘बेटी बचाओ’चा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या प्रवासादरम्यान वृक्षारोपणाचा संकल्पही तिने केला आहे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने पाच हजार झाडे लावली असून १० हजार झाडे लावण्याचा तिचा प्रयत्न आहे.
हरियाणा येथील रेवाडी जिल्ह्यातील छोट्याशा गुर्जर माजरी गावांतील सुनिता चोकन आपल्या ४५ दिवसांच्या सायकल यात्रेवर आहे. मध्य प्रदेश मार्गाने मंगळवारी ती नागपुरात पोहचली. रोटरी क्लबच्या मदतीने तिने पत्रकारांशी संवाद साधला.
सुनिता म्हणाली, ‘रोटरी क्लब रेवरी मेन अॅण्ड डिस्ट्रीक्ट ३०११’ मदतीने १५ जुलै रोजी गुजरात येथील सोमनाथ मंदिर येथून सोलो सायकल प्रवासाला सुरुवात केली. सिक्कीम होत नेपाळला पोहचणार आहे. पहाटे ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रोज १५० किलोमीटर सायकल चालविते. सायंकाळ होताच जवळच्या गावात आश्रय घेते. मंगळवारी मध्य प्रदेशहून नागपुरात पोहचली. पुढे रायपूर होत पुढील मार्गक्रमण करणार आहे. २०११ मध्ये माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. गंगोत्री हिमालय क्षेत्रात ५२ पर्वत शिखर आहेत. हे सर्व शिखर गिर्यारोहकांनी सर केले आहेत. शिखराचे नावही गिर्यारोहक व स्थानिक लोकांनी दिले आहेत. परंतु गंगोत्री हिमालयात काही शिखर असे आहेत ज्यांची उंची सहा हजार मीटरपेक्षा जास्त आहे. हे शिखर सर न झाल्याने त्याला नाव देण्यात आलेले नाहीत. यातील दोन पर्वत शिखराचे नामकरण नुकतेच मी केले. ६००९ मीटर उंच शिखराला ‘आई’ तर ६०२० मीटर उंच शिखराला ‘मुलगी’ हे नाव दिले आहे. गिर्यारोहक असल्याने निसर्गाशी माझा जवळचा संबंध आहे. यामुळे पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत आहे. प्रवासादरम्यान शाळा-महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपणही करीत आहे. या प्रवास दरम्यान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषवाक्याला घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ती म्हणाली. पत्रपरिषदेला रोटरी क्लबचे अध्यक्ष पाहरी, ललित जैन, निवेदिता पेंढारकर उपस्थित होत्या.