अवयवदानातून जीवनदानाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:40 IST2018-09-16T00:40:15+5:302018-09-16T00:40:48+5:30
जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळ; गेल्या वर्षी केली शेतकऱ्यांना मदत

अवयवदानातून जीवनदानाचा संदेश
नागपूर : गणेशोत्सव धार्मिकतेचे प्रतीक नाही, तर सामाजिकतेचा धागा त्याला जोडला गेला होता. आज ब्रिटिशराज नाही; पण सामाजिक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांशी संवेदना जोडण्याचे काम सीताबर्डीच्या जयहिंद बालगोपाल गणेशोत्सव मंडळाने केले आहे. मागील वर्षी दैनावस्थेत असलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाºया या मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमासाठी मंडळाचे सदस्य अवयवदानाचा संकल्प घेणार असून, उत्सवाच्या दहा दिवस जनजागृती करून लोकांनाही अवयवदानासाठी प्रेरित करणार आहेत.
सीताबर्डीच्या मोदी नं. २ मध्ये दर वर्षी मंडळातर्फे गणेशाची स्थापना होत असून, मंडळाचे हे ४३ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष पुष्पक खापेकर यांच्यानुसार १५ वर्षांपूर्वी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिकतेची जोड देण्यात आली. या वेळी विशेष रूपाने अवयवदानाचा उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी डॉक्टरांची एक चमू पूर्ण वेळ उपस्थित राहून अवयवदानाची नोंदणी केली जाणार आहे. सदस्यांसह कमीत कमी १०० लोकांना यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवाची सजावटही त्याच संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.
दर वर्षी विविध उपक्रम
मागीलवर्षी शेतकºयांच्या मदतीसाठी दानपेटीतील सर्व रक्कम दान करण्यात आली. त्याच्या आदल्यावर्षीही अशाचप्रकारे एका शेतकºयाला मदत करण्यात आली होती. दर वर्षी मंडळातर्फे रक्तदान शिबिर राबवून १०० ते १५० रक्ताच्या बॅग दान केल्या जातात. याशिवाय निर्भया घटनेच्या वेळी जनजागृती, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान, सर्व शिक्षा अभियान जागृती, व्यसनमुक्ती व दारुबंदी जनजागृती आदी विविध अभियान दर वर्षी मंडळातर्फे राबविण्यात येतात.