जूनमध्ये पहिल्यांदा ४० च्या खाली घसरला पारा; गाेंदिया, चंद्रपुरात बरसल्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 22:06 IST2023-06-22T22:05:37+5:302023-06-22T22:06:01+5:30
Nagpur News वेधशाळेच्या अंदाजानुसार दिवसभर आकाशात ढगांचे आच्छादन पसरले हाेते आणि चंद्रपूर व गाेंदियामध्ये आनंदाच्या सरीही बरसल्या. नागपूरकरांना मात्र गुरुवारीही दमट उकाड्याचा त्रास सहन करावाच लागला.

जूनमध्ये पहिल्यांदा ४० च्या खाली घसरला पारा; गाेंदिया, चंद्रपुरात बरसल्या सरी
नागपूर : जून महिन्याचे २१ दिवस लाेटल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा नागपूरसह विदर्भाचा पारा ४० अंशांच्या खाली घसरला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार दिवसभर आकाशात ढगांचे आच्छादन पसरले हाेते आणि चंद्रपूर व गाेंदियामध्ये आनंदाच्या सरीही बरसल्या. नागपूरकरांना मात्र गुरुवारीही दमट उकाड्याचा त्रास सहन करावाच लागला.
नागपूरचे कमाल तापमान २.२ अंशांनी घसरून ३८.४ अंशांवर पाेहोचले. सध्या तरी पारा सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी अधिक असला तरी ही घसरण दिलासा देणारी आहे; कारण गेल्या १५ दिवसांपासून उकाड्यामुळे नागपूरकर अक्षरश: वैतागल्यागत झाले आहेत. तसे आजही दिवसभर उष्णतेने छळले; पण सायंकाळ हाेता-हाेता आकाशातील ढगांनी पावसाची आशा निर्माण केली. २०१७ व २०१९ नंतर यंदा मान्सूनने माेठी प्रतीक्षा करायला लावली आहे. यावेळी २४ जूनला जाेरदार धडक देत पावसाच्या आगमनाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
तसेच गाेंदिया आणि चंद्रपूरकरांसाठी गुरुवार आनंददायक ठरला. गाेंदियात दिवसभरात २९ मि.मी. पाऊस पडला; तर चंद्रपुरात १३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. दाेन्ही शहरांत पारा ३८.२ अंश असला तरी पावसाने गारवा पसरला. अमरावतीत सर्वाधिक ३९.६ अंश तापमान हाेते.
दरम्यान, बदलत्या वातावरणात नैर्ऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर व विदर्भात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात चक्रीय वादळ व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने या मान्सूनच्या दाेन्ही शाखांतून पाऊस येताे. तशी वातावरणीय परिस्थिती निर्माण झाली असून २४ तारखेला मान्सून नागपुरात धडकेल असा निश्चित अंदाज आहे. त्यानंतर पुढचे चार-पाच दिवस जाेरदार सरी बरसतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.