गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 20:06 IST2018-04-11T20:06:23+5:302018-04-11T20:06:35+5:30

आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली.

The mentality of those who suspect Gandhiji's contribution is violent | गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक

गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक

ठळक मुद्देमा.म.गडकरी : कस्तुरबा जयंतीनिमित्त बा-बापू मुक्तांगणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंसेच्या मार्गाने राष्ट्र बळकावली जाऊ शकतात, मात्र त्यातून प्रश्न सुटत नाही. कोणत्याही लढ्यासाठी अहिंसेचा मार्ग हाच पर्याय आहे, याची जाणीव महात्मा गांधी यांनी जगाला करून दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सामान्य जनतेच्या मनात स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण व्हावी लागते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने ही ज्योत जागविण्याचे काम केले त्यामुळे देशातील जनता त्यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली. आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली.
कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे बुधवारी बा-बापू मुक्तांगण व चरखा मंदिराचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे, सुरेखा देवघरे, महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे सुनील पाटील, चित्रा तुर, रवी गुडधे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. गडकरी म्हणाले, गांधीजींनी देशाला हिंसेच्या मार्गातून अहिंसेकडे नेले. अ‍ॅड. गडकरी यांनी कस्तुरबा पारशिवनीच्या शाळेच्या उद्घाटनाला आल्याची आठवण यावेळी नमूद केली. कस्तुरबांनी मनापासून गांधीजींच्या कार्यात सहभाग घेतल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी लीलाताई चितळे म्हणाल्या, कस्तुरबा हे निष्ठेचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्त्रीत्व कमी पडू दिले नाही आणि पुरुषांशी स्पर्धाही केली नाही. कस्तुरबा त्याग अंगिकारणाऱ्या जीवनाची प्रेरणा होत्या. आज दिशा दाखविण्यासाठी नव्या पिढीसमोर कोणते आदर्श ठेवावेत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहनही तरुणांना केले.
यावेळी सुरेखा देवघरे यांनी मोहनदास गांधी ते ‘महात्मा’पर्यंतच्या प्रवासात कस्तुरबा यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांचे शिक्षण अल्प असले तरी बुद्धी चाणाक्ष होती व त्यांना वर्तमानाचे भान होते. कस्तुरबाचे पतिव्रत अंधश्रद्ध नव्हते तर त्यांनी अनुभवातून डोळसपणे गांधीजींना स्वीकारले व त्यांच्या देशसेवेत सहभाग घेतला. कस्तुरबा गेल्यानंतर माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाल्याचे गांधीजींनी नमूद केले होते. गांधीजींच्या जीवनात कस्तुरबा या खरोखर कस्तुरीसारख्या होत्या. मात्र त्यांच्या कार्याची हवी तशी दखल घेतली गेली नाही व गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात त्यांचे कार्य झाकोळल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्ष धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्यापेक्षा कस्तुरबाच्या जीवनकार्याचे वाचन होईल अशा कार्यक्रमाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल वाघ यांनी केले.

Web Title: The mentality of those who suspect Gandhiji's contribution is violent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.