Mental health; While Lockdown ends ... | मानसिक आरोग्य; लॉकडाऊन संपता संपता ...

मानसिक आरोग्य; लॉकडाऊन संपता संपता ...

ठळक मुद्देभारत सरकारच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम या उपक्रमात लैंगिकता व प्रजनन या बाबींच्या पलिकडे जाऊन आता या दृष्टीने काही फेरबदल होताना दिसत आहेत. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून समुपदेशक, सुविधांसह समुपदेशन तसेच सामाजिक व वर्तनातील बदल अशा मुद्द


डॉ. नटचंद्र मनोहर चिमोटे
नागपूर
जेव्हा २५ मार्च २०२० रोजी १३० करोड अशा महाकाय लोकसंख्या असलेल्या भारतात लॉकडाऊन सुरु झाले तेव्हा जगातील सर्वात मोठ्या कंटेनमेंट (प्रतिबंधननिती) प्रयोगाची सुरवात झाली. कां? तर भयप्रद रितीने वाढणा-या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा उंचावणारा आलेख खाली आणून तो सपाट करण्यासाठी. बहात्तर दिवसांनी लॉकडाऊन हळूहळू उठवला जात असतानाच आणखी एका नवीन रोगाची साथ जन्माला येत आहे. भारतीय मनोविकार संस्थेने असे निरिक्षण नोंदवले आहे की लॉकडाऊन सुरू झाल्याझाल्या अवघ्या आठवड्याच्या कालावधीत भारतात मनोविकार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्के वाढ झाली आहे.
येत्या काही आठवडे वा महिन्यांमध्ये बेरोजगारी, दारुच्या नशेतले वाईट वर्तन, आर्थिक फरफट, घरगुती भांडणे व हिंसाचार आणि कर्जबाजारीपणा अशा विविध मानसिक अस्वास्थ्य व संकटांच्या पेचप्रसंगाला भारतीय समाजव्यवस्थेला सामोरे जायला लागणार आहे.
आधीच अस्तित्वात असलेल्या पंधरा (१५) करोड मनोविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या व्यतिरिक्त, कोरोनाबाधेतून बरे झालेले, आघाडीवर लढणारे वैद्यकीय व प्रशासनिक कोरोना योद्धे, तरूण माणसे, अकुशल कामगार, स्त्रिया, असंघटित क्षेत्रातील मजूर आणि वडिलधा-या वयोगटातील वृद्ध लोकं हे मानसिक अनारोग्याचे शिकार बनू शकतात असे आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेल्सन मोझेस या आघाडीच्या वकिलाचे म्हणणे आहे.
मानसिक आरोग्य सांभाळणारी सरकारी यंत्रणा आताच इतकी तोकडी पडत आहे तर कोरोनोत्तर काळात या समस्या पेलताना ती केव्हाही कोलमडू शकते. याचे निराकरण करण्यासाठी स्थानिक समाजाच्या उपजत सामर्थ्याचा टेकू घेऊन सप्रमाण सिद्ध झालेले उपाय योजणे आवश्यक आहे. याचे तीन मार्ग आहेत.

कोरोनाबाधेचा कलंक पुसणे
कोव्हीड १९ हा विषाणूचा रोग नेमका कशामुळे पसरतो वा फैलावतो व तो मानवाच्या शरीरावर कसा हल्ला करतो याबद्दल आपल्या समाजात प्रचंड गैरसमज व चुकीच्या धारणा असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण समाजावर कलंक आहे असे समजले जात आहे. कोरोना संकटाविरुद्ध लढणा-या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका व वॉर्ड बॉईज व प्रशासकीय कर्मचारी आणि महत्वाचे म्हणजे पोलीस यंत्रणा या आघाडीवर लढणा-या योद्ध्यांना ते राहात असलेल्या इमारतींमधून त्यांचेच शेजारी त्यांच्याच घरातून हुसकावून लावत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकत आहेत.
हे सर्व टाळण्यासाठी सामाजिक / शारीरिक अंतर ( सोशल डिस्टन्सिंग) संबंधीच्या संकल्पनांची संपूर्णपणे नव्याने पुनर्बांधणी करावी लागेल. काही पूर्णपणे बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी अलिकडे समाज माध्यमांमध्ये आपले अनुभव वाटण्याची बाब खरोखरच खूप उत्साहवर्धक आहे. यामुळे इतर लोकांमध्ये कोरोना विरुद्ध सामना करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतोय. जर, असे बरे झालेल्या कोरोनावर मात करणा-या हजारो लोकांना प्रशिक्षित करुन त्यांना इतर लोकांसमोर म्हणजे ज्यांना कोरोना बाधा होण्याची भीती वाटते किंवा जे संशयित रुग्ण आहेत, त्याच्या समोर कोरोना विजेते म्हणुन मित्राच्या स्वरुपात आले तर, तो फार मोठा मानसिक आधार ठरेल.

समाजातील पायाभूत सुविधांचा आधार वाढविणे
कोरोनाची टिपेला पोहोचलेली तीव्रता जशी कमी होऊ लागेल तशी काही काळ गेल्यावर स्थानिक पातळींवर मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांची हाताळणी करण्यासाठी सामाजिक यंत्रणा उभी करण्याची खरी निकड निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीत निरिक्षक समुपदेशकांची (काऊन्सेलर) च्या लहानशा चमूला डॉ. विक्रम पटेल याच्या संगत किंवा मानसिक आरोग्यविषयक कायदे व धोरण मंडळाच्या आत्मियता सारख्या संस्थांमध्ये प्रशिक्षिण देऊन तयार करणे हे पहिले पाऊल ठरावे.

पौगंडावस्था व किशोरावस्थेतील मुलांमध्ये आनंदी वृत्ती निर्माण करणे 
गेले अडीच महिन्याहून अधिक काळ भारतातील २६ करोड (सव्वीस) शाळकरी मुले शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे घरातच तुरुंगवास भोगताहेत. त्यांची वैयक्तिक मोकळीक वा अवकाश आक्रसून गेला आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींपासून ते दुरावले गेले आहेत. भयंकर वेगाने फैलावणा-या विषाणुमुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ध्यानीमनी नसताना उद्भवलेल्या अशा वातावरणात मुलांची संपूर्ण पिढी वाढत आहे. त्यांना अकल्पित भवितव्याची उत्तरे स्पष्टपणे मिळत नाहीये. यातून जगाविषयी त्यांचा दृष्टीकोन कसा असेल हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.
पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची चुक केली तर मोठ्या अरिष्टाला आमंत्रण देण्यासारखे आहे. युनिसेफ या जागतिक संघटनेने नमुद करुन ठेवले आहे की या मुलांच्या समस्येत फार मोठी गुंतवणूक असणार नाही पण त्याकडे दुर्लक्ष केले तर मात्र मुलांच्या व तरुणाईच्या मानसिक अनारोग्याचे दुष्परिणाम आताच्या कोव्हीड १९ महामारीच्या आरोग्य आणि आर्थिक परिणामांपेक्षा महाभयंकर असतील आणि ते दीर्घकालीन असतील यांत शंकाच नाही !

Web Title: Mental health; While Lockdown ends ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.