प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांचा धडाका
By Admin | Updated: October 7, 2014 00:59 IST2014-10-07T00:59:13+5:302014-10-07T00:59:13+5:30
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नागपूरमध्ये विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका उडविण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांचा धडाका
नागपूर: विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नागपूरमध्ये विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका उडविण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
निवडणुकीचा प्रचार सोमवारी १३ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता थांबेल. १५ तारखेला मतदान आहे. सध्या प्रचारासाठी फक्त सात दिवस शिल्लक आहेत. या सात दिवसात प्रमुख राजकीय पक्षाच्या दिग्गजांच्या सभा नागपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. ७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे. ९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण मतदारसंघात प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती १० तारखेला नागपूरमध्ये येत असून त्यांची कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
प्रचार सभेच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्षांचे अर्ज येणे सुरूच आहे. प्रत्येक मतदारसंघात एकाच दिवशी अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होत असल्याने आयोगाच्या व्हिडीओ पथकाचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. प्रमुख मैदाने सभांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
आतापर्यंत शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. आचारसंहितेचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमध्ये खर्चाचे विवरण सादर न करणाऱ्या चार उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)