निसर्गाशी भेट हीच चांगल्या आराेग्याची गुरुकिल्ली : विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:34+5:302021-04-11T04:07:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निसर्गाशी भेट हीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली होय. नि:शुल्क मिळणारे हवा आणि पाणी अतिशय महत्त्वाचे ...

निसर्गाशी भेट हीच चांगल्या आराेग्याची गुरुकिल्ली : विजय दर्डा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गाशी भेट हीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली होय. नि:शुल्क मिळणारे हवा आणि पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. चांगली झोप आणि हास्य हेही तेवढेच महत्त्वाचे असल्याची भावना लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. सत्तरी आणि ऐंशीच्या वयोगटातील नागरिकांसाठी नावेदा वेलनेस आणि हाँगकाँगतर्फे ‘ऐंशी ही नवीन पन्नाशी’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.
नावेदा वेलनेसचे संचालक लाल दर्यानानी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हे अनोखे आयोजन करण्यात आले. नावेदा वेलनेस एक अभियान म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करीत असून, अशाप्रकारे १२ वेबिनार जानेवारीपासून आयोजित करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटचे वैज्ञानिक डॉ. संजय नगरकर, नावेदा वेलनेसच्या संस्थापक व संचालिका वीणा दानसिंघानी, जीवा बॅलन्सचे संस्थापक जगदीश ब्रम्टा, युनिक यू करिअर-ब्रुसेल्सच्या संचालिका अलिशा अली प्रामुख्याने उपस्थित होते. विजय दर्डा यांनी जीवन बदलणारे वेबिनार असल्याचे कौतुक केले. दर्यानानी हे गंगेप्रमाणे शुद्ध आणि सुंदर व्यक्तिमत्त्व असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांचे तपकिरी केस धुके पडलेल्या हिमालयाची आठवण देतात, तर त्यांचे हृदय ऋषिकेश यांच्या जिंगल्सची आठवण देतात. आपण विश्वासू मित्र आहात, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली. अनेक माणसे पैसा द्यायला तयार असतात; पण वेळ नाही. मात्र, लालभाई इतरांना त्यांचा वेळ देतात. १०० पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांनी सर्वत्र गर्वाने भारतीय ध्वज उंचावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सुदृढ जीवनशैलीविषयी बोलताना दर्डा म्हणाले, मी कित्येक वर्षांपासून नैसर्गिक उपचार पद्धती घेत आहे. मी दररोज हळद, तुळशी, आले व कडूलिंबाचे पत्ते टाकून काढा पित असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक समूहाने चुकीचे शब्द सुधारावे. योगा नाही योग आहे, आयुर्वेदा नाही आयुर्वेद, असे वापरण्याचे आवाहन दर्डा यांनी याप्रसंगी केले.
वीणा दनसिंघानी यांनी लाल दर्यानानी यांची ओळख देताना सांगितले, त्यांनी त्यांच्या जीवनातून मध्यम वयाच्या लोकांसाठी आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगण्याचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. नावेदा म्हणजे नॅचरोपॅथी आणि भारतीय वेद यांचे काँबिनेशन होय. याद्वारे आम्ही चार वेदांचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेशदादा जैन यांनी दर्यानानी यांच्या वयाला हरविणाऱ्या मोहक व्यक्तित्वाचे वर्णन करताना सांगितले, एकदा चीनला गेलो असताना आम्ही जेवणाचे बिल देण्यासाठी भांडत होतो. ज्याचे वय जास्त, तो बिल देईल, असे ठरले. मला वाटले मी मोठा आहे; पण त्यांचे पासपोर्ट पाहिल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसल्याची आठवण त्यांनी नमूद केली. ते आपल्यापेक्षा तरुण वाटत असल्याचे जैन म्हणाले.
वैज्ञानिक डॉ. संजय नगरकर यांनी १९९१ पासून हाँगकाँग विद्यापीठात आयुर्वेदावर संशोधन सुरू करण्याबाबत सांगितले. घरगुती उपचार पद्धतीला औषधी म्हणून वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त करणे हा उद्देश आहे. या गोष्टी का चांगल्या आहेत, यासाठी जागतिक पटलावर संशोधन सुरू केले. आम्ही आयुर्वेद आणि वेदांचा प्रसार करीत असल्याचे ते म्हणाले.