मेडिकल होणार ‘स्ट्रेचर फ्री’

By Admin | Updated: December 19, 2015 02:45 IST2015-12-19T02:45:27+5:302015-12-19T02:45:27+5:30

रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेंडंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या दोघांचाही तुटवडा आहे.

Medical will be 'stretcher free' | मेडिकल होणार ‘स्ट्रेचर फ्री’

मेडिकल होणार ‘स्ट्रेचर फ्री’

‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ आली : राज्यातील पहिलाच प्रयोग
नागपूर : रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेंडंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या दोघांचाही तुटवडा आहे. कधी स्ट्रेचर राहते तर अटेंडंट राहत नाही. ही बिकट वेळ निभावून नेताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची दमछाक होते. यावर पर्याय म्हणून मेडिकल प्रशासनाने ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ची मदत घेतली आहे. यातील एक अ‍ॅम्ब्युलन्स शुक्रवारी मेडिकलमध्ये उपलब्ध झाली असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
मेडिकलमध्ये ४६ वॉर्ड मिळून १४०१ खाटांची व्यवस्था आहे. बाह्य रुग्ण विभागात रोज अडीच हजारावर रुग्णांची तपासणी केली जाते. परंतु अपघात विभाग असो किंवा बाह्यरुग्ण विभाग, येथे स्ट्रेचर्ससाठी रुग्णाच्या नातेवाईकांना शोधाशोध करावी लागायची. अनेकवेळा गंभीर रुग्णांना पाठीवर घेऊन वॉर्डात नेण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. अनेकवेळा स्ट्रेचर मिळाले तर अटेंडंट मिळत नसे. यातच सरकारने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. आधीच कर्मचारी कमी आणि त्यात वेळही जास्त लागत असल्याने यावर पर्याय शोधणे गरजेचे झाले होते, त्यामुळे प्रशासनाने ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ खरेदीसंदर्भात जूनमध्ये प्रस्ताव पाठविला होता, तो मंजूर करण्यात आला. हैदराबादच्या तेजस्विनी डीलरकडून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. एक दिवस चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर हे वाहन पूर्णत: सेवेत दाखल होणार आहे. सध्या मेडिकलमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची २५० वर पदे रिक्त आहेत. पदभरती करण्याकडे शासन लक्ष देत नसल्याने भार कमी करता यावा म्हणून प्रशासनाला हे वाहन खरेदी करावे लागले आहे. (प्रतिनिधी)

अशी आहे ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’
या ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ची किंमत जवळपास साडेसहा लाख रुपये आहे. हे आॅटोमॅटिक अ‍ॅम्ब्युलन्स वाहन बॅटरीवर चालते. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभाग किंवा अपघात विभागापासून कोणत्याही वॉर्डात हे वाहन सहज रुग्ण पोहचवू शकते. रुग्ण ने-आण करण्यासाठी वेळही नेमून दिला जाणार आहे. एक प्रशिक्षित कर्मचारीच ने-आण करेल. यामुळे मनुष्यबळ वाचणार आहे. या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्ण व त्यांच्यासोबत दोन नातेवाईक बसण्याची व्यवस्था राहणार आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास गरजेएवढ्या ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Medical will be 'stretcher free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.