Medical staffer assaulted: hospital premises unsafe | मेडिकलच्या कर्मचाऱ्याला मारहाण : रुग्णालयाचा परिसर असुरक्षित

मेडिकलच्या कर्मचाऱ्याला मारहाण : रुग्णालयाचा परिसर असुरक्षित

ठळक मुद्देअजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या एका इन्टर्नला मारहाण करण्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याला रुग्णालयाच्या परिसरात मारहाण करण्याची घटना घडली. यावरून मेडिकलचा परिसर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मेडिकलचे स्वच्छता निरीक्षक नरसिंग देवरवाड हे मेडिकल परिसरातील ‘ओटी जी’च्या मागील भागातील क्वॉर्टरमध्ये राहतात. याच भागात थोडे पुढे बांधकाम विभागाने मजुरांना राहण्यासाठी तात्पुरत्या झोपड्या बांधून दिल्या आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजता नरसिंग मोबाईलवर बोलत घरासमोरील रस्त्यावरून जात असताना झोपड्यांमधून जोरजोराने आवाज येत असल्याने ते त्या दिशेने गेले. झोपडीत बांधकाम विभागाचे दोन कामगार व मेडिकलमधील कक्ष परिसर पदावर काम करणारा रॉबिन विपीन फिलिप्स हे तिघेरी दारू पित होते. घराजवळ हा प्रकार सुरू असताना नरसिंग यांनी जाब विचारला. परंतु उलट तिघेही शिव्या देऊ लागले. दारुच्या नशेत असलेल्या फिलिप्सने जवळची वीट उचलून मारली. यामुळे नरसिंगचा डाव्या डोळ्याजवळील कपाळावर आणि उजव्या हाताच्या बोटाला किरकोळ जखम झाली. त्यांनी ढकलून दिल्याने पाठीला जबर मार बसला, नंतर ते पळून गेले. या घटनेची नरसिंग यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षक मोबाईलवर!
एका वरिष्ठ डॉक्टराने सांगितले, मेडिकलचा मोठा पैसा सुरक्षा रक्षकांवर खर्च होतो. परंतु त्या तुलनेत हवी तशी सुरक्षा नाही. अनेक सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना मोबाईलवर बोलत असतात. यामुळे संशयित व्यक्तीवर त्यांची नजर पडत नाही. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासमोर मोठ्या प्रमाणात अ‍ॅम्ब्युलन्स, ऑटोरिक्षा, ई-रिक्षाचे अवैध स्टॅण्ड झाले आहे. यातून गुन्हेगारी फोफावत आहे. त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे

Web Title: Medical staffer assaulted: hospital premises unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.