Medical: Purchase of 25 ventilators from two crores | मेडिकल : दोन कोटीतून होणार २५ व्हेंटिलेटरची खरेदी
मेडिकल : दोन कोटीतून होणार २५ व्हेंटिलेटरची खरेदी

ठळक मुद्देजिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी पडत आहे. रुग्णालयात खाटांची संख्या २५००वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणजे, दरदिवशी व्हेंटिलेटरला घेऊन गोंधळ उडतो. रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे हा प्रस्ताव येताच त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून २ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून लवकरच वयस्क व लहान मुलांसाठी २५ व्हेंटिलेटरची खरेदी केली जाणार आहे.
रुग्णला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचे कार्य अत्याधुनिक यंत्र व्हेंटिलेटर करते. सध्या मेडिकलच्या अतिदक्षता विभागात आठ, शस्त्रक्रियेच्या ‘रिकव्हरी’ वॉर्डात तीन, बालरोग विभागात दोन, ‘मेडिसीन’ व ‘सर्जरी’ आकस्मिक विभागात प्रत्येकी दोन तर स्वाईन फ्लू वॉर्डातील पाच व्हेंटिलेटर आहेत. यातील पाच नादुरुस्त आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकलमध्ये रोज नव्या येणाऱ्या चार-पाच गंभीर रुग्णांना या व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु ते वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर नाईलाजाने हाताने रबरी फुगा दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची वेळ येते. याला वैद्यकीय भाषेत ‘बॅग अ‍ॅण्ड मास्क व्हेंटिलेशन’ असे म्हणतात. यामुळे गंभीर रु ग्णांचा जीव धोक्यात येतो. अनेकवेळा खासगी हॉस्पिटलमधून मेडिकलमध्ये रुग्ण आणायचा असल्यास व्हेंटिलेटर आहे किंवा नाही त्याची माहिती घ्यावी लागते. काही रुग्णाचे नातेवाईक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी आमदार, खासदारांकडून प्रशासनावर दबावही आणतात. व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. व्हेंटिलेटरीच गरज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढेही मांडण्यात आली. याची गंभीरतेने दखल घेत त्यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर मार्फत व्हेंटिलेटरसाठी २ कोटी ८८ लाख, ३७ हजार रुपये मंजूर करून दिले. यातून ‘अ‍ॅडल्ट’ आणि ‘पेडियाट्रिक’साठी लागणाऱ्या २५ व्हेंटिलेटरची खरेदी केली जाणार आहे. या खरेदीला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्सकडून या यंत्राची खरेदी केली जाणार आहे. यामुळे येत्या काळात मेडिकलमधील व्हेंटिलेटरची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

नव्या अतिदक्षता विभागाला हवे ९० व्हेंटिलेटर
मेडिकलमध्ये प्रत्येक ३०-३० खाटांचे ‘सर्जिकल इन्टेसिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेसिव्ह केअर युनिट’ आणि ‘नवजात शिशू इन्टेसिव्ह केअर युनिट’चे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच यंत्रसामुग्री उपलब्ध होऊन रुग्णसेवेत हे अतिदक्षता विभाग रुजू होणार आहे. मेडिकल प्रशासनाने प्रत्येक विभागासाठी ३० व्हेंटिलेटर अशा ९० व्हेंटिलेटरची मागणी केल्याची माहिती आहे.

ट्रॉमात हवे २५ व्हेंटिलेटर
अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णसेवा उपलब्ध होण्यासाठी मेडिकलने ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. मात्र ७२ खाटांच्या या सेंटरमध्ये केवळ १७ व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांची संख्या पाहता आणखी २५ व्हेंटिलेटरची गरज आहे. तसा प्रस्तावही मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

 

Web Title: Medical: Purchase of 25 ventilators from two crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.