स्वातंत्र्यदिनी नागपूर आणि अमरावतीतही मांस विक्रीवर बंदी; महापालिकांच्या निर्णयावरून वाद निर्माण
By शुभांगी काळमेघ | Updated: August 12, 2025 20:08 IST2025-08-12T20:08:05+5:302025-08-12T20:08:40+5:30
१५ आणि २० ऑगस्टला कत्तलखान्यांना टाळे : राज्यभरात मांस विक्रीवर बंदी

Meat sale banned in Nagpur and Amravati on Independence Day; Controversy over municipal decision
नागपूर : स्वातंत्र्यदिन आणि गोकुळाष्टमी या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक महापालिकांनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन महापालिकेनेही १५ आणि २० ऑगस्ट या दोन दिवशी कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाची ठिणगी पडली आहे.
महापालिकांच्या आदेशानुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनासोबत गोकुळाष्टमीचा सणही साजरा होणार आहे. २० ऑगस्टपासून जैन धर्मीयांचे पवित्र 'पर्युषण पर्व' सुरू होत आहे. या दोन्ही दिवशी कोणतीही कत्तल करण्यास तसेच मांस विक्रीस मनाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कडून यासंदर्भात अधिकृत परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
नागपूर महापालिका आणि अमरावती महापालिका यांनी देखील १५ ऑगस्ट रोजी मटन, चिकनची दुकाने आणि कत्तलखाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. नागपूर मनपाने यासाठी लवकरच नोटीस जारी करण्याचे सांगितले असून, शासनाच्या मागील निर्णयाचा आधार घेत हा आदेश लागू करण्यात येणार आहे.
विक्रेत्यांकडून विरोधाची शक्यता
महापालिकांच्या या निर्णयामुळे मांस विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही विक्रेत्यांनी या बंदीला विरोध करण्याची तयारी दाखवली असून, त्यामध्ये व्यापारी संघटनाही सहभागी होण्याची शक्यता आहे.