‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 06:16 IST2025-07-09T06:16:21+5:302025-07-09T06:16:21+5:30
माफक किमतीत पोटभर जेवण मिळणार असल्याच्या या ‘गूड न्यूज’मुळे कोट्यवधी रेल्वे प्रवासी हुरळून गेले होते.

‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर
नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वेस्थानकावर ७० रुपयांत पोटभर जेवण मिळेल, अशी बातमी रेल्वेच्या ‘एक्स’वर झळकल्याने प्रवासी खुश झाले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वेस्थानकावर, ट्रेनमध्ये त्याची सुरुवातच झाली नसल्याने आणि ती कधी होणार, हेदेखील स्पष्ट नसल्याने प्रवासी सध्या ‘ढूंढते रह जाओंगे’चा अनुभव घेत आहेत.
भारताची लोकवाहिनी मानल्या जाणाऱ्या रेल्वेत रोज कोट्यवधी नागरिक प्रवास करतात. त्यातील ८० ते ९० टक्के प्रवासी घरून जेवण सोबत घेत नाहीत. रेल्वेगाडी अथवा रेल्वेस्थानकावर मिळेल ते खाऊन ही मंडळी प्रवास करतात. ते लक्षात घेता भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) तर्फे रेल्वेस्टेशनवर ७० रुपयांत आणि ट्रेनमध्ये ८० रुपयांत प्रवाशांना जेवण दिले जाणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात ‘एक्स’वर आली होती. त्यात ‘मेन्यू’ कोणता राहणार, तेदेखील स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, भात , डाळ किंवा सांबार, दही, २ पराठे किंवा चार पोळ्या, भाजी आणि लोणचे दिले जाणार होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही या बातमीला दुजोरा दिला होता.
माफक किमतीत पोटभर जेवण मिळणार असल्याच्या या ‘गूड न्यूज’मुळे कोट्यवधी रेल्वे प्रवासी हुरळून गेले होते. तेव्हापासून शेकडो प्रवासी रेल्वेस्थानकावर रोज हे ७० रुपयांचे जेवण शोधतात. मात्र, त्यांना ते जेवण कुठेही आढळत नाही.