‘मोडी लिपी’चा जन्मदाता दुर्लक्षित
By Admin | Updated: July 26, 2015 03:17 IST2015-07-26T03:17:42+5:302015-07-26T03:17:42+5:30
वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, ...

‘मोडी लिपी’चा जन्मदाता दुर्लक्षित
नागपूर : वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, त्या ‘मोडी लिपी’चा जनक असलेला भाट समाज आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. शेकडो वर्षांपासून भटकंती करूनच आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भाट समाजाची नोंद शासनदरबारी भटक्या विमुक्ताच्या वर्गात नसल्याने अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे. परिणामी गरिबीत खितपत पडलेल्या समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
जुन्या काळात अनेक लोकं आपली वंशावळी लिहून ठेवायचे. वंशावळ लिहून ठेवण्याचे काम भाट समाज करायचे. ज्या लिपीमध्ये ही वंशावळी लिहून ठेवली जायची त्याला मोरी लिपी किंवा प्रचलित भाषेत मोडी लिपी असे म्हटले जाते. ही लिपी केवळ भाटांनाच लिहिता वाचता येत असल्याने त्याला भाटाची लिपी सुद्धा म्हटले जाते. या लिपीचा शोध कधी लागला याचा फारसा उल्लेख नसला तरी ही लिपी भाट समाजात पारंपरिक पद्धतीने आली.
शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. त्यामुळे या लिपीचा जन्मदाता हा भाट समाज असल्याचे मानले जाते. परंतु आधुनिकतेच्या काळात ही लिपी नामशेष व कालबाह्य झाली आहे. त्यामुळे भाट समाजाचा उदरनिर्वाह कधीचाच हिरावला गेला. आज या समाजाचे लोक तांड्यावर राहतात. मिळेल ते काम करतात. गावोगावी फिरून लोकांची वंशावळी लिहिण्याचे काम हा समाज करीत होता. परंतु शासन दरबारी भाट समाजाची नोंद ही ओबीसी प्रवर्गात करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही भटके विमुक्त असल्याने आमची नोंद भटके विमुक्त वर्गात करण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज लढा देत आहे.
हा लढा केवळ शासनाच्या योयी सवलती मिळण्यासाठी नसून आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी आहे. आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात भाट समाजाची लोकसंख्या केवळ दीड लाख आहे. काही बोटावर मोजण्यासारखी मंडळी सोडली तर हा समाज आजही डोंगरदऱ्यात राहतो. उदरनिर्वाहासाठी सातत्याने भटकंती करीत आहेत.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यात सर्वाधिक संख्या भाट समाजातील मुलांची होती. अशा परिस्थितीत गरिबीत खितपत पडलेल्या या समाजाला शासनाच्या मदतीची गरज आहे. (प्रतिनिधी)