नागपूर : उपराजधानीत एमडी तस्करीचे प्रमाण वाढले असून आरोपींची आता हिंमतदेखील वाढायला लागली आहे. एमडी तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनीअटक केली असून त्यातील एका आरोपीकडे पिस्तुलदेखील आढळले. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. दोन कारवायांत पोलिसांनी ८६ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली आहे.
रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसडीपीएल कॉलनीजवळील न्यू म्हाडा क्रवॉर्टरकडे जाणाऱ्या टी पॉईन्टजवळ सापळा रचला. पोलिसांनी शेख सलमान शेख कलीम (३४, म्हाटा कॉलनी, कपिलनगर), शेख शाहरूख शेख कलीम (२७, म्हाडा कॉलनी, सम्राट अशोकनगर) व स्वप्निल उर्फ बिडी नरेश जांभुळकर (२२, गड्डीगोदाम) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ २० ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्यांच्याकडून मोबाईल फोन, दुचाकी असा १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हैदर परवेज मोहम्मद काजीम (२६, बंगाली पंजा, लेंडी तलाव) याच्याकडून एमडी पावडर आणल्याची माहिती दिली. तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली व कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.
पोलिसांच्या पथकाने रात्रीच परवेजचा शोध सुरू केला. पहाटे सव्वा चार वाजता पोलिसांनी त्याला तांडापेठ येथील शिव मंदिरासमोरून दुचाकीवरून जाताना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६६ ग्रॅम एमडी व पिस्तुल आढळले. त्याच्याजवळून ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात पाचपावली पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.
भिवंडीवरून आणली पावडर
पोलिसांनी परवेजची सखोल चौकशी केली असता त्याला भिवंडी येथील एका तस्कराकडून एमडी पावडर मिळाल्याची त्याने कबुली दिली. शेख मुकर्रम (४०, भिवंडी) याच्याकडून एमडी पावडर घेतल्याचे त्याने सांगितले.