२० वर्षीय तरुणाकडून एमडी जप्त, एनडीपीएस पथकाची कारवाई
By योगेश पांडे | Updated: March 29, 2023 16:55 IST2023-03-29T16:53:04+5:302023-03-29T16:55:28+5:30
एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

२० वर्षीय तरुणाकडून एमडी जप्त, एनडीपीएस पथकाची कारवाई
नागपूर : २० वर्षे वयाच्या एका तरुणाकडून पोलिसांनी ४.५४ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली आहे. या पावडरची किंमत सुमारे ४५ हजार इतकी आहे. एनडीपीएस पथकाने ही कारवाई केली.
सोमवारी मध्यरात्रीच्या अगोदर ही कारवाई करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएसचे पथक गस्तीवर असताना एक तरुण एमडी पावडर घेऊन येणार असल्याची टीप मिळाली. पोलिसांनी ठवरे कॉलनी मार्गावर सापळा रचला व दुचाकीवरून येणाऱ्या पार्थ संजय बन्सोड (२०, लघुवेतन कॉलनी) याला थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ४.५४ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.
पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल, दुचाकी असा एकूण १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल, गोरख कुंभार, राजकुमार त्रिपाठी, प्रदीप काईट, अजय ठाकूर, सागर यादव, संतोष पांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.