मतानी लोहमार्ग सुरक्षा विभागाचे अधीक्षक, तर नित्यानंद झा यांची यवतमाळ अधीक्षकपदी बदली
By योगेश पांडे | Updated: May 15, 2026 20:28 IST2026-05-15T20:27:48+5:302026-05-15T20:28:35+5:30
Nagpur : आदित्य मिरखेलकर, अन्नपूर्णा सिंह, कुमार चिंता यांच्याकडे नागपूरच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी

Matani transferred as Superintendent of Railway Safety Department, while Nityanand Jha transferred as Yavatmal Superintendent
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या असून शहराला तीन नवीन उपायुक्त मिळाले आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त लोहीत मतानी यांची अचानक महामार्ग सुरक्षा अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर परिमंडळ दोनचे उपायुक्त नित्यानंद झा यांच्याकडे यवतमाळ अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपूर शहरातील विविध संवेदनशील प्रकरणांमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे तसेच वाहतूक विभागात अनेक बदल घडवून आणणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मतानी यांची महामार्ग सुरक्षा अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. महामार्गांवरील वाढते अपघात, वाहतूक शिस्त आणि गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने त्यांच्या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे. तर महामार्ग सुरक्षा विभागातील उपायुक्त यशवंत सोळंखे यांची अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. राज्यभरात वाढत्या ड्रग्ज नेटवर्कविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असताना सोळंखे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल मदने यांना वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. संवेदनशील प्रकरणांतील समन्वय, कायदा व सुव्यवस्था नियंत्रण आणि विविध विशेष मोहिमांमधील त्यांच्या कामगिरीची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
यवतमाळचे विद्यमान पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची नागपुरात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. ग्रामीण आणि जिल्हास्तरीय प्रशासनाचा मोठा अनुभव असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांची नागपुरात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कठोर प्रशासन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या ओळखल्या जातात. नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचीदेखील नागपुरात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांअगोदर निकेतन कदम यांची अमरावती पोलीस अधीक्षकपदी बदली झाली होती. याशिवाय नागपूर ग्रामीणमधील उमरेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांची सोलापूर शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.