राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या महिला कब्बडीपटूला नोकरी देतो सांगून केले लग्न; त्याच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन
By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2025 16:44 IST2025-12-12T16:42:05+5:302025-12-12T16:44:28+5:30
कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन : माळेगाव टाऊन येथील घटना

Married a female kabaddi player who played at the national level on the promise of a job; tired of his troubles, ended her life
लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : आर्थिक परिस्थिती हलाखीची, शिक्षण घेऊनही हाताला काम नाही, त्यातच तरुणाने तिला नोकरी मिळवून देण्यासाठी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नोकरी मिळेल या आशेपोटी महिला कबड्डीपटूने त्याच्याशी लग्न तर केले, मात्र काही दिवसांनी आपण लग्न करून फसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातच त्याचा मानसिक त्रासही वाढला. हा मनस्ताप असह्य झाल्याने अखेर तिने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे रविवारी (दि. ७) घडली.
किरण सूरज दाढे (वय २९, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) असे मृत महिला कबड्डीपटूचे, तर स्वप्निल जयदेव लांबघरे (३०, रा. पटकाखेडी, ता. सावनेर) असे फरार आरोपीचे नाव आहे. किरणने सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयात बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेत तिने विद्यापीठासोबत राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविले. उत्कृष्ट कबड्डीपटू असल्याने आपल्याला नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असल्याने तिने सैन्य दलासोबत पोलिस, होमगार्ड, डिफेन्ससह अन्य विभागांत नोकरीसाठी सतत प्रयत्न केले. नोकरी मिळण्यात यश येत नसल्याने तसेच घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने सावनेरातील डॉ. अनुज जैन यांच्या डेंटल क्लिनिकमध्ये, तर तिच्या धाकट्या भावाने मोबाइल शॉपीमध्ये कामाला सुरुवात केली.
पुढे त्याचा त्रास वाढल्याने तिने त्याचे मोबाइलमधील सर्व मॅसेज जतन करून ठेवत गुरुवारी (दि. ४) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेले. प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर करीत आहेत.
संबंध ठेवण्यासाठी दबाव
लग्नानंतर स्वप्निल तिला व तिच्या भावाला नोकरी लावून देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. सोबतच संबंध ठेवण्यासाठी तो दबाव आणत होता. संबंधासाठी आई-वडिलांना नकार दिल्यास घटस्फोट देण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. तिला अडवून त्रास देणे, फोनवर शिवीगाळ करणे असे प्रकार त्याने सुरू केल्याने तिने घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. तरीही त्याचे तिला त्रास देणे सुरूच होते.
लग्नानंतरही माहेरीच राहायची
याच काळात तिची स्वप्निलसोबत ओळख झाली. त्याने तिच्या अगतिकतेचा फायदा घेत त्याची शेती वेकोलिने अधिग्रहित केल्याने त्या शेतीच्या आधारे तिला व तिच्या भावाला वेकोलित नोकरी लावून देण्याची बतावणी केली.
त्यासाठी आपल्यात नातेसंबंध असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याने तिला लग्न करण्याची सूचना केली. तिने विश्वास ठेवत दि. १० जुलै २०२० रोजी त्याच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. काही दिवसांनी तिच्या कुटुंबीयांना या लग्नाबाबत कळले. मात्र, ती लग्नानंतरही माहेरीच राहायची.