मराठा आंदोलनाचा एसटीला जबर फटका; २० हजार किलोमीटर वाहतूक प्रभावित
By नरेश डोंगरे | Updated: September 7, 2023 14:47 IST2023-09-07T14:47:20+5:302023-09-07T14:47:34+5:30
एसटीच्या नागपूर विभागाचे ७ लाख, ५३ हजार, ९१३ रुपयांचे नुकसान झाले.

मराठा आंदोलनाचा एसटीला जबर फटका; २० हजार किलोमीटर वाहतूक प्रभावित
नागपूर : राज्यात सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या मराठा आंदोलनाने एसटी महामंडळाला जबर फटका दिला आहे. या आंदोलनाची धग राज्यातील १९,५१६ किलोमिटर मार्गावर पसरल्याने नागपूर विभागाचे अवघ्या पाच दिवसांत ७, ५३, ९१३ रुपयांचे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठी हल्ला केल्याने शांततेत सुरू असलेले आंदोलन वेगळ्याच वळणावर गेले. राज्यभरात ठिकठिकाणी या लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत आंदोलक रस्त्यावर आल्याने हजारो किलोमिटर मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली. त्याचा फटका एसटी महामंडळाच्या ठिकठिकाणच्या फेऱ्यांना बसला.
एकट्या नागपूर विभागाचा विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड, सोलापूर, पंढरपूर, परभणी, अंबेजोगाई या मार्गावर नागपूरहून धावणाऱ्या बसेस जागच्या जागी थांबल्या. पाच दिवस या बसेस बंद असल्याने या दिवसांतील १९,५१६ किलोमिटरची प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. परिणामी एसटीच्या नागपूर विभागाचे ७ लाख, ५३ हजार, ९१३ रुपयांचे नुकसान झाले.