अनेक चौकांत ठेवले जात नाहीत वाहतूक पोलीस :सरकारचे हायकोर्टात उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:16 IST2019-03-21T00:15:39+5:302019-03-21T00:16:21+5:30
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक चौकांत वाहतूक पोलीस तैनात ठेवले जात नाहीत ही माहिती बुधवारी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे पुढे आली. हे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.

अनेक चौकांत ठेवले जात नाहीत वाहतूक पोलीस :सरकारचे हायकोर्टात उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक चौकांत वाहतूक पोलीस तैनात ठेवले जात नाहीत ही माहिती बुधवारी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रामुळे पुढे आली. हे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.
वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एक चौकात किती पोलीस तैनात केले जातात, शहरातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोणत्या वेळी असते आणि शहरात किती महत्त्वाचे चौक आहेत याची माहिती सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांनी हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर एक आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.
शहरातील चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कुणी वाहतूक नियम तोडताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. असे असले तरी वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. परंतु, बरेचदा वाहतूक पोलीस रोडच्या बाजूने मोबाईल पाहताना दिसून येतात. वाहनचालक त्याचा फायदा घेऊन वाहतूक नियम तोडतात. असे चित्र नेहमीच पहायला मिळत असल्यामुळे उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात अॅड. श्रीरंग भांडाकर न्यायालय मित्र आहेत.