रोजगार बुडाल्याने अनेकांचा मद्यतस्करीत शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:34 AM2020-04-29T11:34:41+5:302020-04-29T11:35:47+5:30

व्यवसाय, धंदे बंद पडले आणि हातचा रोजगार हिसकावला गेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांनी, उच्चशिक्षित तसेच अभियंत्यांनीही नाईलाजाने मद्यतस्करी आणि विक्रीच्या गोरखधंद्यात उडी घेतल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Many are involved in alcohol smuggling due to loss of employment | रोजगार बुडाल्याने अनेकांचा मद्यतस्करीत शिरकाव

रोजगार बुडाल्याने अनेकांचा मद्यतस्करीत शिरकाव

Next
ठळक मुद्देउच्चशिक्षित अन् अभियंत्यांचाही सहभाग धक्कादायक वास्तव उजेडात

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसाय, धंदे बंद पडले आणि हातचा रोजगार हिसकावला गेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांनी, उच्चशिक्षित तसेच अभियंत्यांनीही नाईलाजाने मद्यतस्करी आणि विक्रीच्या गोरखधंद्यात उडी घेतल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक माहिती पुढे आली आहे. कोरोनाच्या महामारीने मोठे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक सर्वांचेच कंबरडे मोडल्यासारखे झाले आहे. सरकारी नोकरदार वगळता साऱ्यांचीच अवस्था वाईट आहे. खासगी कंपन्या, व्यवसायातील मंडळी अक्षरश: बेरोजगार झाली आहे. हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांतील तरुण नाईलाजाने मद्यतस्करी आणि विक्रीत ओढले गेले आहेत. रविवारी मध्यरात्री तहसील पोलिसांच्या पथकाने एका कारमधून चार तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लाख, ७८ हजार रुपयांची रोकड आणि विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. या चौघांची पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक वास्तव उजेडात आले. अटक करण्यात आलेला राहुल नावाचा तरुण याचे औषध विक्रीचे दुकान आहे. दुसरा गणेश नामक तरुण टेलिकॉम इंजिनिअर असून तो जिओ कंपनीत कार्यरत होता. तिसºया कल्पेश नामक तरुणाचे स्टेशनरी दुकान असून, चौथा रोशन नामक तरुण फुलांच्या डेकोरेशनचा व्यवसाय करतो. लॉकडाऊनमुळे या चौघांचेही रोजगार हिसकावून घेतल्यासारखे झाले. त्यामुळे जीवनावश्यक चीजवस्तू आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हे चौघेही मद्यतस्करी आणि विक्रीत ओढले गेले, असे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. केवळ हे चौघेच नव्हे, तर गेल्या आठवड्यात पोलिसांनी विविध भागात सापळे लावून आणि छापेमारी करून मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी आणि विक्री करताना अनेकांना पकडले. त्यातील अनेक जण नवखे, उच्चशिक्षित असल्याचे पुढे आले आहे.
कोरोना- लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढली. रोजगार संपला आणि काहीच करण्यासारखे उरले नसल्याची अनेकांची भावना झाली आहे. त्यात ज्यांना मद्याचे व्यसन आहे, अशांची अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. त्यातील अनेक जण कोणत्याही किमतीत घसा ओला करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आठशे रुपयांची मद्याची बाटली चक्क तीन हजार रुपयांना विकली जात आहे. मद्याला सर्वत्र प्रचंड मागणी आहे. त्यामुळे विविध दुकानात काम करणारे डिलिव्हरी बॉय, छोट्या-मोठ्या कंपनीत, मॉल, दुकानात हेल्पर असलेली मुले, आॅटोचालक आणि अनेक वाहनचालक मद्यविक्री करू लागले आहेत. यातील अनेक जण वेगवेगळ्या भागात पकडले गेले आहेत.

सहज उपलब्ध आहे मद्य
सरकारने वाईन शॉप, बीअरबार बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे ठिकठिकाणची मद्याची दुकाने आणि बीअरबार बंद आहेत. तरीसुद्धा नागपुरातील कोणत्याही भागात सहज मद्य उपलब्ध आहे.
प्रीमियम ब्रँडची बीअरही अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. रविवारी गोकुळपेठसारख्या पॉश भागात बिअरचा मोठा साठा बाळगणाºया दोघांना पोलिसांनी बीअरची विक्री करताना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, वटानी आणि गोलानी नामक हे दोघे मद्यविक्रे ते मध्य भारतातील कुख्यात बुकी कमनानीचे हस्तक म्हणून ओळखले जातात. आर्थिक कोंडी झाल्याने नव्हे तर मद्याची प्रचंड मागणी असल्याने आणि तीनशे रुपयांच्या बाटलीला पंधराशे रुपये मोजण्यास मद्यपी तयार असल्यामुळे ते मद्यविक्रीचा धंदा करीत असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.

मध्य प्रदेशातून होत आहे तस्करी
नागपुरात मध्य प्रदेशातून मद्याची मोठी तस्करी होत आहे. नियमित मोठ्या खेपा मद्यतस्कर नागपुरात आणत आहेत. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील हे मद्य महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात तळीरामांची अस्वस्थता वाढल्याने आणि ते कोणतेही मद्य विकत घ्यायला तयार असल्यामुळे मद्यतस्करांचे चांगलेच फावले आहे.

बनावट मद्याला ऊत
नागपुरात बनावट मद्यविक्रीला ऊत आला आहे.
ब्लेंडर, आॅफिसर चॉईस, मेकडॉल नंबर वन,ओल्ड मंक, रेड रम, रॉयल स्टॅग सारखे बनावट मद्य सर्रास विकले जात आहे. हे मद्य आरोग्यास घातक असूनही त्याची तस्करी आणि खरेदी-विक्री नागपुरात जोरात सुरू आहे.

 

Web Title: Many are involved in alcohol smuggling due to loss of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.