मनीष श्रीवास हत्याकांड :गुन्हे शाखेचे पथक पुरावे गोळा करण्यासाठी मध्यप्रदेशात जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 23:26 IST2021-04-07T23:25:29+5:302021-04-07T23:26:42+5:30
Manish Srivastava murder case मनीष श्रीवास हत्याकांड प्रकरणातील पुरावे आणि सूत्रधार रणजित सफेलकर याच्याशी संबंधित लोकांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेशात जाणार आहे.

मनीष श्रीवास हत्याकांड :गुन्हे शाखेचे पथक पुरावे गोळा करण्यासाठी मध्यप्रदेशात जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनीष श्रीवास हत्याकांड प्रकरणातील पुरावे आणि सूत्रधार रणजित सफेलकर याच्याशी संबंधित लोकांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेशात जाणार आहे. गुन्हे शाखा सफेलकरने लपवलेल्या मोबाईलचा शोधात आहे. मोबाईलचा पत्ता लावण्यासाठी त्यांनी सफेलकरची पोलीस कोठडी १२ तारखेपर्यंत वाढविली आहे. सफेलकर हा ३० मार्चपासून गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. त्याचा साथीदार कालू आणि भरत हाटे तसेच हेमंत गोरखा हे न्यायालयीन कोठडीत आहे.
मध्य प्रदेशात सफेलकरचे नेटवर्क आहे. आपल्या विश्वासू लोकांच्या मदतीनेच तो तिथे लपून बसला होता. सफेलकरकडे सॅमसंग गैलेक्सी ८ सिरीजचा एक माोबाईल आहे. त्यात मनीष श्रीवास हत्याकांडाचे अनेक राज लपून आहेत. त्या मोबाईलनेच सफेलकर आपल्या साथीदारांना कॉल किंवा मॅसेज करीत होता. तो मोबाईल जप्त करण्याोबतच त्याला संरक्षण देणाऱ्यांचाही गुन्हे शाखा शोध लावणार आहे.
गुन्हे शाखेने बुधवारी सफेलकरला जेएमएफसी एम.डी. जोशी यांच्या न्यायालयासमोर सादर करीत १५ एप्रिलपर्यंत ताब्यात देण्याची विनंती केली होती. परंतु न्यायालयाने १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली.
इतर प्रकरणही खोदून काढण्याची तयारी
कळमना खंडणी वसुली आणि जमीन बळकाबण्याचे प्रकरण दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा सफेलकरशी संबंधित इतर प्रकरणही खोदून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. काही लोकांनी गुन्हे शाखेकडे तक्रारही केली आहे. त्या तक्रारीतील तथ्याच्या आधारावर पोलीस नवीन गुन्हे दाखल करण्याची तयारी करीत आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या दिवसात सफेलकर व त्याच्या टाेळीसाठी विशेष ठरणार आहे.