शिवस्मारक वैदर्भीयांसाठी मानाचा तुरा

By Admin | Updated: November 23, 2014 00:35 IST2014-11-23T00:35:33+5:302014-11-23T00:35:33+5:30

मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक हे वैदर्भीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे प्रतिपादन मुंबईतील टीम वन आर्किटेक्ट्सचे (इंडिया) प्रा. लि.चे प्रिन्सिपल

Mana Tura for Shivsamarka Vidyasheya | शिवस्मारक वैदर्भीयांसाठी मानाचा तुरा

शिवस्मारक वैदर्भीयांसाठी मानाचा तुरा

भरत यमसनवार यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक
नागपूर : मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक हे वैदर्भीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे प्रतिपादन मुंबईतील टीम वन आर्किटेक्ट्सचे (इंडिया) प्रा. लि.चे प्रिन्सिपल आर्किटेक्ट भरत यमसनवार यांनी येथे केले.
भरत यमसनवार हे शिवस्मारकाचे आर्किटेक्ट आहेत. ते आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधला. ज्यांच्या कार्यकाळात हे स्मारक उभे राहणार आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा वैदर्भीयच आहेत.
१६ एकरमध्ये उभारणी
यमसनवार यांनी सांगितले की, १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचा शिलान्यास होणार आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून समुद्रात चार कि़मी. अंतरावर जवळपास १५ ते १६ एकर परिसरात शिवस्मारक उभारणे हे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि तज्ज्ञांची गरज भासणार आहे. प्रत्यक्षात काम सुरू होईल तेव्हा लोकांचा सल्ला विचारात घेतला जाईल. प्रारंभी अर्थात २००९ मध्ये हा प्रकल्प ४५० कोटींमध्ये उभारला जाणारा होता. पण आता या प्रकल्पाचे बजेट ८०० ते १००० कोटींवर गेले आहे. पुढे पाच ते सहा वर्षात प्रकल्प पूर्ण होईपर्यंत बजेट वाढू शकते, असे यमसमवार म्हणाले.
शिवस्मारकाचा २००९ मध्ये निर्णय
शिवाजी महाराजांचे स्मारक कुठे व्हावे, यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने स्मारक मुंबई व्हावे, हे ठरले. समितीने ११ जागांची निवड केली. पुढे स्मारक समुद्रात उभारावे, असा मतप्रवाह पुढे आला. यासाठी २००८ मध्ये स्पर्धा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १० आर्किटेक्ट कंपन्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत आमच्या कंपनीने सादर केलेल्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. अखेर २००९ मध्ये अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाला अनुसरून शिवस्मारक उभे करण्यात येणार आहे. आराखडा तयार होऊन निविदा निघतील आणि जवळपास सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे भरत यमसनवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शिवस्मारक प्रत्यक्षात शिवलिंगाची प्रतिकृती
टीम वन आर्किटेक्ट्सचे (इंडिया) प्रा.लि. या कंपनीतर्फे उभारण्यात येणारे शिवस्मारक प्रत्यक्षात शिवलिंगाची प्रतिकृती राहील. शिवराय भवानीभक्त आणि शिवभक्त होते. शिवरायाच्या पुतळ्यासभोवताल किल्ल्यासारखी तटबंदी आणि बुरूज राहतील. बांधकाम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल, शिवाय या वास्तूमध्ये नाजुकता राहील. २५० जणांना बसता येणारे ड्रामा थिएटर, तीन मजली उंच आंतरराष्ट्रीय आर्ट सेंटर आणि कन्व्हेंन्शन सेंटर राहील. शिवरायाच्या पुतळ्याची उंची जवळपास ४०० मीटर अर्थात जवळपास २० मजली इमारतीएवढी राहील. पेशवेकालीन छत्री, मोगल गार्डनची संकल्पना, सॅन्ड स्टोनची भिंत आणि त्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगी कोरले जातील. पर्यटकांना थेट पाहता येतील. शिवकालीन १० किल्ल्यांचे मॉडेल बनविले जाईल. त्याद्वारे लोकांना शिवरायाची विस्तृत माहिती मिळेल. शिवाय २०० जणांसाठी फिरते रेस्टॉरंट राहील. रात्रीच्या वेळी हे स्मारक मरीन ड्राईव्ह येथून स्पष्ट दिसेल. या ठिकाणी बोटीने अथवा हेलिकॉप्टरने जाता येईल.

Web Title: Mana Tura for Shivsamarka Vidyasheya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.