नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 11:16 IST2022-07-14T11:05:30+5:302022-07-14T11:16:40+5:30
शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरील घटना, खासदाराच्या पुतण्यालाही मारहाण

नागपुरात रक्तरंजित थरार, पेट्रोल पंपावर टोळक्याकडून एकाची हत्या
नागपूर : कारागृहात असलेल्या मकोकाचा आरोपी शेखूचा भाऊ सरोज खान याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावर घडली. या हल्ल्यात चंद्रपूरचे कॉंग्रेसचे खासदार यांच्या पुतण्यावरही हल्ला करून लुटण्यात आले. या घटनेमुळे शहर पोलिसात खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करीत होते.
गोरेवाडा येथील सरोज खान बुधवारी रात्री ११ वाजता कारने शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला. त्याचवेळी सात ते आठ हल्लेखोर सरोज खानला शोधत तेथे आले. त्यांनी सरोजला कारमधून बाहेर ओढून त्याच्यावर शस्त्रांनी वार केले. तसेच दगडाने ठेचून ते फरार झाले.
दरम्यान, त्याच वेळी खासदार बाळू धानोरकर यांचा पुतण्या प्रतीक धानोरकर हासुद्धा बाजूलाच पेट्रोल भरत होता. आरोपींनी त्याच्यावरही हल्ला चढविला. त्याच्या बाईकची तोडफोड करून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. या नंतर आरोपींनी पंपावरील सीसीटीव्हीची आणि पेट्रोल पंपाची तोडफोड केली. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सरोजला शंकरनगरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सरोजचे साथीदारही रुग्णालयात पोहोचले. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात तगडा बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत होते.