हातचलाखीने मोबाईलमधून सीम काढले अन बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न
By योगेश पांडे | Updated: April 24, 2025 18:19 IST2025-04-24T18:19:03+5:302025-04-24T18:19:03+5:30
बँक व्यवस्थापकाच्या समयसूचकतेमुळे आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली

हातचलाखीने मोबाईलमधून सीम काढले अन बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न
नागपूर : एका आरोपीने सभागृह मालकाच्या मोबाईलमधून हातचलाखीने सीमकार्ड काढले व त्यानंतर केवायसीच्या नावाखाली त्यांचे बँक खाते थेट बँकेत जाऊनच रिकामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक व्यवस्थापकाच्या समयसूचकतेमुळे आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मुरलीधर महादेवराव गजभिये (७०, हजारीपहाड) यांचे दाभा येथे श्री संत गजानन सेलिब्रेशन नावाचे सभागृह आहे. या प्रकरणात सत्तार कुतुबुद्दीन अन्सारी (५०, भांडे प्लॉट, उमरेड रोड) हा आरोपी आहे. अन्सारीने गजभिये यांच्या सभागृहाच्या फर्निचरचे काम केले होते. त्याला गजभिये यांनी त्यासाठी ३४ लाखांचा धनादेश दिला होता व दोघांमध्येही चांगला परिचय होता. २२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता एक महिला व एक पुरुष गजभिये यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी एका दिवसासाठी सभागृह भाड्याने घ्यायचे आहे असे म्हटले. दरम्यान, नेटवर्क नसल्याचा दावा करत फोन करण्याच्या बहाण्याने त्यांनी गजभिये यांना फोन मागितला. त्याने हातचलाखी करत त्यांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढले व त्यात बनावट सीम टाकले. काही वेळाने गजभिये यांचा एकही फोन लागत नसल्याने त्यांनी फोन तपासला असता बीएसएनएलऐवजी व्हीआयचे सीमकार्ड दिसले. त्यांनी लगेच त्यांचे बॅंक खाते असलेल्या कॅनरा बॅंकेत फोन करून खाते ब्लॉक करण्यास सांगितले. एक दिवस अगोदर गजभिये यांचा मुलगा असल्याची बतावणी करत एक व्यक्ती आला होता व त्याने मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज घेतला असल्याची माहिती बॅंक व्यवस्थापकांनी दिली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी अन्सारी हा गजभिये यांचे बँक खाते असलेल्या कॅनरा बॅंकेच्या शाखेत पोहोचला. त्याने तेथील व्यवस्थापकांची भेट घेऊन फोन क्रमांक लिंक असलेल्या खात्याची केवायसी करायची आहे असे सांगितले. व्यवस्थापकांना संशय आल्याने त्यांनी गजभिये यांना शाखेत बोलवून घेतले. त्यावेळी आरोपी अन्सारीचे बिंग फुटले. त्याने अर्जावर गजभिये यांचा फोटो लावत खोटी स्वाक्षरी केली होती. अन्सारीला गजभिये यांचे बॅंक खाते रिकामे करायचे होते. गजभिये यांच्या तक्रारीवरून अन्सारीविरोधात तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.