लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी पदावर विजया बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महिलाराज आले आहे.
बनकर या सेवाज्येष्ठ उपजिल्हाधिकारी असून, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिकारी होत्या. नागपूर जिल्हा आणि विभागाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. राज्य सरकारने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात जिल्ह्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपजिल्हाधिकारी शीतल देशमुख यांची मुंबईला बदली झाली. त्यांच्या जागी सुजाता गंधे यांना नियुक्ती देण्यात आली. रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे यांची अमरावती निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी गोंदियाच्या वंदना सवरंगपते यांची नियुक्ती करण्यात आली. तर भंडाऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांना नागपूरला उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पदावर नियुक्ती देण्यात आली.