के अँड के ब्रदर्स या फर्मचे मालक महेश केसवानीला ३३.९५ कोटींच्या करचोरी प्रकरणी अटक
By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 2, 2025 20:01 IST2025-08-02T19:46:13+5:302025-08-02T20:01:28+5:30
एसजीएसटी विभागाची नागपुरात मोठी कारवाई : आरोपीला न्यायालयीन कोठडी

Mahesh Keswani, owner of K&K Brothers firm, arrested in tax evasion case of Rs 33.95 crore
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) विभागाने ३३ कोटी ९५ लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) प्रकरणी के अँड के ब्रदर्स या फर्मचे मालक महेश गुरुदास केशवानी (६२) याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
महेश गुरुदास केशवानी याने १४ पुरवठादारांकडून कोणतीही वस्तू किंवा सेवांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता, केवळ बनावट बिलांच्या आधारे ३३.९५ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. हे इनपुट टॅक्स क्रेडिट बनावट करदात्यांकडून घेण्यात आल्यामुळे, त्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ चे उल्लंघन केले. त्यामुळे, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने करचोरी करणाऱ्या बोगस बिल ट्रेडिंग विरोधात चालवलेल्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत महेश गुरुदास केशवानी याला ३१ जुलै रोजी अटक केली. कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यासमक्ष हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या करदात्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई नागपूर क्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त तेजराव पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यकर सहआयुक्त (नोडल-१) डॉ. संजय के. कंधारे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये राज्यकर उपायुक्त (अन्वेषण-२) डॉ. मुकेश एम. राठोड, सहायक राज्यकर आयुक्त (अन्वेषण-२) रमेश व्ही. दळवी, राज्यकर निरीक्षक ललितकुमार बोपचे, संजय शिंदे, जयंत नागपूरकर, प्रवीण सावके, डॉ. प्रवीण जाधव, राहुल देवकर, श्रु्रती कुंभारकर, पूनम राणे, सायली वाडकर आणि कर सहायक संदीप वाघमारे यांनी केली.