Mahavitran employees assault Case : FIR Registered | महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : अखेर दखलपात्र गुन्हा दाखल

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : अखेर दखलपात्र गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात अखेर कलम ३५३, ५०४, ५०६ व १८६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या ४ नोव्हेंबर रोजी महावितरणकर्मचारी मुनेश्वर कापसे व राहुल मेश्राम हे कंत्राटी वसुली कर्मचारी अक्षय परासकर यांचेसोबत भालदारपुरा येथील बडा मस्जिद परिसरातील अब्दुल्लाबेग चमूबेग या ग्राहकाकडील सुमारे १ लाख ५५ हजाराची थकबाकी असल्याने त्या घरी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या महिलेला त्यांनी थकबाकीबाबत माहिती दिली व अर्धा तास वाट बघितल्यानंतर काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तेथील वीजपुरवठा खंडित करून दुसऱ्या ग्राहकाकडे कारवाईसाठी गेले असता परवेज खान या आरोपीने या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली, याशिवाय मुनेश्वर कापसे या वीज कर्मचाऱ्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे ते खाली पडल्यानंतर त्यांना परत मारहाण करीत बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी गणेशपेठ पोलीसांनी कलम ३२३, ५०४ व ५०६ या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी दोषींविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून त्याचेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा केला, अखेर ६ नोव्हेंबर रोजी या आरोपीविरोधात शासकीय कामकाजात अडथळा करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग करणे या आरोपाखाली दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या या सहकार्याबद्दल महावितरणने त्यांचे आभार व्यक्त केले असून महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Mahavitran employees assault Case : FIR Registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.