भारतीयांच्या एकजुटीविषयी गांधीजींचे निरीक्षण ही इंग्रजांची उलटीपट्टी! : सरसंघचालक मोहन भागवत
By निशांत वानखेडे | Updated: November 29, 2025 20:28 IST2025-11-29T20:18:38+5:302025-11-29T20:28:08+5:30
राष्ट्रीय पुस्तक महोत्सवातील मुलाखतीत काय म्हणाले मोहन भागवत...?

Mahatma Gandhi's observation in the book 'Hind Swaraj' is extremely wrong! Mohan Bhagwat's criticism at the National Book Festival
नागपूर : ‘ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय एकजूट नव्हते’, असे ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात नमूद असलेले महात्मा गांधी यांचे निरीक्षण हे इंग्रजांनी शिकवलेली उलटीपट्टी आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. माेहन भागवत यांनी येथे व्यक्त केलें.
नागपूरच्या रेशीमबाग येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात शनिवारी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘राष्ट्र’ आणि ‘नेशन’ या संकल्पनांवर मत मांडले. ते म्हणाले, भारत नेहमीच ‘राष्ट्र’ राहिला आहे. विविध राज्यकर्त्यांच्या शासनात आणि परकीय राजवटीतसुद्धा आपला देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात हाेते. त्यामुळे ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारत राष्ट्र म्हणून एकजूट नव्हते, हे गांधीजींचे निरीक्षणच इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाच्या उलटीपट्टीचे आहे, असे मत त्यांनी मांडले.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, ‘नेशन’ ही संकल्पना इंग्रजांनी आपल्यावर लादली आणि आपणही तेच शब्द वापरू लागलो. मात्र ‘राष्ट्र’ हे केवळ नॅशनलिझम नसून ‘राष्ट्रत्व’, ‘राष्ट्रभाव’ आहे. पाश्चिमात्य अतिराष्ट्रवाद अहंकाराचे प्रतीक आहे व त्यामुळेच दोन महायुद्धे झाली. भारतीय राष्ट्रभाव एकतेतून जन्माला आला आहे. भारतात ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘परोपकार’ ही भावना मुळापासून आहे. धर्म, भाषा, आहार, परंपरा आणि प्रांत असे विविध भेद असले तरी आपण सर्वजण भारतमातेची मुले आहोत, ही एकता आपल्याला जोडून ठेवते. देशात विविधता असूनही आपला संस्कार एकतेचा आहे, हेच राष्ट्रत्व आहे, असे डाॅ. भागवत म्हणाले.
वाद करणे, संघर्ष करणे हा आपल्या देशाचा स्वभाव नाही. परंपरेपासून आपल्याकडे परस्पर मैत्री, सहकार्य आणि एकत्र चालण्याची संस्कृती आहे. परदेशातील परिस्थिती भिन्न आहे. तेथील राष्ट्रनिर्मितीत संघर्ष, संघर्षातून आलेली आक्रमकता आणि वर्चस्वाचा भाव दिसतो. त्यामुळेच त्यांच्या ‘नेशन’ आणि आपल्या ‘राष्ट्र’ या दोन्ही संकल्पना अगदी वेगळ्या आहेत. आपले ‘राष्ट्र’ प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ते सत्ता, सीमारेषा किंवा राजकीय व्यवस्था यांवर आधारित नसून, संस्कार, एकता आणि परोपकाराच्या भावनेवर उभे आहे. ‘जेन-झी’च्या लेखकांनी ‘नेशन’चे भाषांतर ‘राष्ट्र’ असे केल्यास त्यातील भावार्थ हरवू शकतो. साहित्यात चुकीच्या शब्दप्रयोगांमुळे गोंधळ निर्माण हाेऊ शकताे आणि संस्कृतीवर परिणाम करू शकताे. लेखकांनी मुळांचा अभ्यास करून अनुभवावर आधारित लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.