ODOP-2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल! नागपुरी संत्र्याला रौप्य, अमरावतीच्या मंदारिन संत्र्याला कांस्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:40 IST2025-07-17T15:37:02+5:302025-07-17T15:40:22+5:30

संत्र्यांची चमक, कापसाची ताकद : विदर्भाच्या कामगिरीचा देशभर बोलबाला!

Maharashtra tops ODOP-2024! Nagpuri orange wins silver, Amravati's mandarin orange wins bronze | ODOP-2024 मध्ये महाराष्ट्र अव्वल! नागपुरी संत्र्याला रौप्य, अमरावतीच्या मंदारिन संत्र्याला कांस्य पुरस्कार

Maharashtra tops ODOP-2024! Nagpuri orange wins silver, Amravati's mandarin orange wins bronze

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
केंद्र सरकारच्या 'एक जिल्हा, एक उत्पादन -२०२४' उपक्रमात महाराष्ट्राने 'अ' श्रेणीतील सुवर्णपदक पटकावले असून, या यशात विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांनी मोलाची कामगिरी करत कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील आपल्या विशिष्ट उत्पादनांसाठी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पुरस्कार पटकावले आहेत.


सोमवारी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरित करण्यात आले. नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त करत रौप्य पदक पटकावले. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


अमरावती जिल्ह्याने आपल्या मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणीअंतर्गत तृतीय स्थान मिळवले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रत्येक जिल्ह्याच्या विशिष्ट उत्पादनांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचा उद्देश आहे. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दुतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले.


अकोला जिल्ह्याला कापूस प्रक्रियेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
एक जिल्हा, एक उत्पादन-२०२४' या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी करत 'अ' श्रेणीतील सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याला कापूस प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.
कापूस उत्पादन आणि त्याच्या प्रक्रियेतील अकोल्याच्या प्रगतीमुळे जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यावतीने जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला. अकोला हा अकृषी क्षेत्रात पुरस्कार प्राप्त करणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा ठरला आहे.


 

Web Title: Maharashtra tops ODOP-2024! Nagpuri orange wins silver, Amravati's mandarin orange wins bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.