Maharashtra Assembly Election 2019: Nine thousand policemen guard at Nagpur | Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात नऊ हजार पोलीसांचे सुरक्षा कवच

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात नऊ हजार पोलीसांचे सुरक्षा कवच

ठळक मुद्देनिमलष्करी दलही मदतीला : रात्रंदिवस गस्त : झोपडपट्ट्यांमध्ये सर्चिंग : संवेदनशील भागावर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. निमलष्करी दलाच्या ६०० जवानांसह सुमारे ९ हजार पोलीस मतदानाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. तर, नागपूर जिल्ह्यातही जोरदार तयारी करण्यात आली असून, निमलष्करी दलासह पाच हजारांवर पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
विधानसभेच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासूनच पोलिसांनी नियोजनपूर्वक बंदोबस्त केल्यामुळे कोणत्याही प्रकारची मोठी अनुचित घटना घडली नाही. उपराजधानीतील संवदेनशील भागात पोलिसांनी कोम्बिंग, झोपडपट्टी सर्चिंग केले. उपद्रवी पार्श्वभूमी असलेल्यांना पोलीस ठाण्यात आणून आधीच कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता उपद्रवी व्यक्तींकडून निवडणुकीच्या कार्यकाळात मोठी अनुुचित घटना घडली नाही. प्रत्यक्ष मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना पोलिसांनी शहरात कोण कोणती जबाबदारी पार पाडेल, त्याचे नियोजन केले आहे. शहरातील ८४२ इमारतीत २,६७७ मतदान केंद्रावर विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. कोणत्याच मतदान केंद्रावर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून शहर पोलीस दलातील तीनपैकी तीनही अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० उपायुक्त, १४ सहायक आयुक्त, ८४ पोलीस निरीक्षक, २८२ पोलीस उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक, ४,८७१ पुरुष तर १२९५ महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या मदतीला निमलष्करी दलाच्या (केंद्रीय पोलीस दल) ६ कंपन्या (६०० जवान), महाराष्ट्रातील १००० तर मध्य प्रदेशातील ९०० होमगार्डस् राहणार आहेत. रात्रंदिवस पोलिसांची गस्त राहणार असून, कुठे काही गडबड गोंधळ झाल्यास अवघ्या काही मिनिटात आजूबाजूच्या भागात गस्त करणारे सर्वच्यासर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तेथे पोहचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्वांची मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त घेणार आहे.

कायदा मोडणाऱ्यांची भीडमुर्वत करणार नाही : पोलीस आयुक्त
लोकशाहीच्या उत्सवात खोडा घालू पाहणाºया समाजकंटकांवर वेळीच कडक कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाºया कुणाचीही भीडमुर्वत करायची नाही, असेही त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तर, नागपुरातील कोणत्याही भागात कसलीही अनुचित घडामोड किंवा संशयास्पद हालचाली दिसत असेल तर पोलिसांना कळवा, असे आवाहन डॉ. उपाध्याय यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.

असा असेल बंदोबस्त

अतिरिक्त पोलीस आयुक्त : ३
पोलीस उपायुक्त : १०
सहायक आयुक्त : १४
वरिष्ठ निरीक्षक : ८४
पीएसआय ते एपीआय : २८२
पोलीस कर्मचारी : ४८७१
महिला कर्मचारी : १२९५
होमगार्डस् : १९००
निलष्करी दलाचे जवान : ६००

शहर आणि जिल्ह्यातील कारवाई
५०० वर दारू विक्रेत्यांवर कारवाई
एक हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई
प्रचार कालावधीत १ कोटी २३ लाख रुपये जप्त

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Nine thousand policemen guard at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.