Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:51 IST2019-10-15T21:51:05+5:302019-10-15T21:51:44+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला.

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला. भाजप कितीही भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असला तरी काँग्रेस मात्र जनतेशी निगडित दैनंदिन मुद्यांवरच निवडणूक लढवेल आणि यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खरगे आणि थोरात यांनी मंगळवारी प्रेस क्लब येथे संयुक्त पत्रपरिषद बोलावली होती. यावेळी खरगे यांनी राहुल गांधी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोक काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आम्ही येथील स्थानिक मुद्यावरच बोलत आहोत. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. तो आता कितीतरी मागे गेला आहे. शेतकरी आत्महत्या विदर्भात सर्वाधिक होत आहेत. कृषी विकास दर हा नेहमीच साडेचार ते ५ टक्के राहिला आहे. परंतु तो खाली येऊन २.४ टक्केवर आला आहे. कृषी उत्पादनही घटले आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अपयशी ठरत आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे. हे मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. लोकांनाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते सुद्धा परिवर्तनाच्या तयारीत आहेत.६० वर्षाचा हिशेब मागणारे त्यांचे केवळ पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड का सादर करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार जाहिरातबजी करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा दुप्पट होणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काँग्रेस महाआघाडीला चांगले यश मिळेल. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. नवीन रोजगार दूरच आहे तो रोजगारही हिरावला जात आहे. त्यामुळे लोकांनाच परिवर्तन हवे आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ४२ व ४१ असे होते. ते यंदा दुप्पट होतील, आणि काँग्रेस महाआघाडीचीच सरकार येईल, असा दावा केला.