Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ५८.३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 10:55 PM2019-10-21T22:55:04+5:302019-10-21T23:10:12+5:30

संपूर्ण नागपूर जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६०.७१ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.३० टक्के इतकी आहे.

Maharashtra Assembly Election 2019: 58.03% voting in Nagpur district | Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ५८.३ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात ५८.३ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देकिरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत : पावसाची मेहरबानीनवमतदारांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाच्या सावटाखाली सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी व काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६०.७१ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदानाची सरासरी टक्केवारी ५८.३० टक्के इतकी आहे. सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यात एकूण १४६ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले व गुरुवारी निकाल समोर येणार आहे. नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.


जिल्ह्यातील सर्वच मतदानकेंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले.

दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली.
‘व्हीआयपी’ मतदारांचे मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, राज्याचे ऊर्जामंत्री व भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.
सर्वाधिक उत्साह काटोलमध्ये
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात ५८.३० टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान काटोलमध्ये (७०.५५ %) तर सर्वात क मी पश्चिम नागपूर मतदारसंघात (४९.६० % ) मतदान झाले. याशिवाय जिल्ह्यात उमरेड (६८.२३ %), हिंगणा (५७.३५ %), रामटेक (७०.०९ %), कामठी (५८.९५ %), सावनेर (६८.१४ %) येथे इतके मतदान झाले. तर नागपूर शहरात नागपूर दक्षिण-पश्चिम (५०.३७ %), नागपूर दक्षिण (५०.८० %), नागपूर पूर्व (५३.५३ %), नागपूर मध्य (५०.८८ %), नागपूर उत्तर (५१.११ %) इतके मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार नागपूर शहरात सरासरी ५१.०४ टक्के तर नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर ६५.५४ टक्के मतदान झाले.
सावनेरमध्ये तणाव
सावनेर मतदार संघातील सिल्लेवाडा येथे भाजपचे उमेदवार डॉ.राजीव पोतदार त्यांच्या समर्थकासह मतदान केंद्रात शिरल्याने माजी ग्रामपंचायत सदस्या वसुंधरा शहाणे यांनी त्यांना हटकले. यावरून येथे काही काळ तणाव निर्माण झाला.
सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’
प्रत्यक्ष मतदानकेंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मॅसेज’ची देवाणघेवाण सुरू होती.


मतदानाच्या टक्केवारीचा पल्ला
वेळ                          टक्केवारी
सकाळी ९ वाजता      ७.२६ %
सकाळी ११ वाजता    १९.७४ %
दुपारी १ वाजता        २९.७८ %
दुपारी ३ वाजता        ४३.३१ %
सायंकाळी ६ वाजता ५८.३० %

मतदारसंघनिहाय आकडेवारी
मतदारसंघ                 २०१९                 २०१४
नागपूर दक्षिण पश्चिम ५०.३७ %            ५६.२३ %
नागपूर दक्षिण           ५०.८० %            ५३.२७ %
नागपूर पूर्व                ५३.५३ %           ५६.२८ %
नागपूर मध्य              ५०.८८ %           ५५.१२ %
नागपूर पश्चिम            ४९.६० %           ५२.१४ %
नागपूर उत्तर             ५१.११ %            ५३.५५ %
काटोल                     ७०.५५ %           ७०.३८ %
सावनेर                     ६८.१४ %           ६८.९१ %
हिंगणा                      ५७.३५ %          ६५.९९ %
उमरेड                      ६८.२३ %          ६५.८१ %
कामठी                     ५८.९५ %          ६२.२४ %
रामटेक                   ७०.०७ %           ६८.५७ %
सरासरी                 ५८.३० %         ६०.७१ %

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: 58.03% voting in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.