महालक्ष्मी जगदंबा देवस्थान घेणार अनाथांचे पालकत्व; कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना मदत
By कमलेश वानखेडे | Updated: May 27, 2023 18:51 IST2023-05-27T18:50:41+5:302023-05-27T18:51:20+5:30
Nagpur News कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महालक्ष्मी जगदंबा देवस्थान घेणार अनाथांचे पालकत्व; कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना मदत
कमलेश वानखेडे
नागपूर : कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदतीसह त्यांचे पालकत्व कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर प्रशासनाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे अनाथ बालकांचे भविष्य घडविण्यासाठी मंदिर प्रशासनासह दानदात्यांचाही हातभार लागणार आहे.
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या शनिवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संस्थानाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेच्या अमलबजावणीचा प्रस्ताव एकमताने पारित केला. यावेळी संस्थानाचे उपाध्यक्ष नंदूबाबू बजाज, सचिव दत्तूची समरीतकर, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, प्रभाताई निमोने, केशवराव महाराज फुलझेले, अजय विजयवर्गी, अशोक खानोरकर, प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, लक्ष्मीकांत तडस्कर, ॲड. मुकेश शर्मा उपस्थित होते.
या बालकांचे स्वीकारले पालकत्व
संकेत किशोर बंधिया (देवलापार), अमन अंकुश हिरकने (देवलापार), प्रणाली किशोर बांधिया (देवलापार), दीक्षा अंकुश हिरकने (देवलापार), रोहिणी विजय चव्हाण (महादुला)
श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान संस्थानाने उचललेले हे पाऊल भविष्याचा दृष्टीने मोलाचे पाऊल ठरणार आहे. ज्यातील एक महत्त्वाचे संस्थान या नात्याने आपले समाजाला काहीतरी देणं लागते या भावनेतून देवस्थानचे काम सुरू आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे