महाज्योती युपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा घेणार प्रवेश परीक्षा !

By आनंद डेकाटे | Updated: July 22, 2023 14:25 IST2023-07-22T14:21:54+5:302023-07-22T14:25:07+5:30

काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या

Mahajyoti will retake entrance exam for UPSC training! | महाज्योती युपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा घेणार प्रवेश परीक्षा !

महाज्योती युपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा घेणार प्रवेश परीक्षा !

नागपूर : महाज्योतीतर्फे घेण्यात आलेल्या युपीएससी प्रशिक्षण प्रवेश परीक्षेत गैरप्रकार झाल्याने महाज्योती आता पुन्हा प्रवेश परीक्षा घेणार आहे. प्रवेश परीक्षेची तारीख महाज्योतीद्वारे संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द केली जाईल.

महाज्योती मार्फत युपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी गेल्या १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतून परीक्षा घेणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली.

सदर एजन्सी मार्फत महाज्योती करीता युपीएससी पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी १६ जुलै रोजी परीक्षा आयोजीत केलेली होती. या परीक्षेसाठी २०,२१८ उमेदवार पात्र होते. त्यातील १३,१८४ उमेदवारांनी महाराष्ट्रातील १०२ परीक्षा केद्रांवर तर दिल्ली येथील २ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्त केले होते.चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला सदर प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता.

परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने गैरप्रकाराची चौकशी करून पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची विनंती महाज्योती संस्थेला केली आहे. तसेच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी देखील महाज्योतीकडे पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्राप्त अहवालानूसार महाज्योतीने युपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षेत गैरप्रकार करतांना विद्यार्थी आढळून आल्यास अश्या विद्यार्थ्यांवर जागेवर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सक्त सुचना महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला दिल्या आहेत.

Web Title: Mahajyoti will retake entrance exam for UPSC training!