महादेवाची मंदिरे गेली पाण्याखाली ! लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:28 IST2026-04-10T13:22:58+5:302026-04-10T13:28:20+5:30
Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची वाढ रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली.

Mahadev's temples are underwater! Why is the water level in Lonar Lake rising?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची वाढ रोखण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली. तसेच, या समितीने येत्या १५ दिवसांत बैठक आयोजित करून लोणार सरोवरातील पाण्याची पातळी का वाढत आहे, याची कारणे शोधावी आणि त्यावर उपाययोजना निर्धारित कराव्या, असे निर्देश दिले.
समितीमध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी यांचा सचिव म्हणून तर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, व्हीएनआयटी प्रतिनिधी, ज्येष्ठ अॅड. आनंद परचुरे, या प्रकरणातील न्यायालयमित्र अॅड. मोहित खजांची आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. बेसाल्ट खडकांवर पडलेल्या उल्केमुळे तयार झालेले हे जगातील दुर्मीळ 'मेटिओराइट क्रेटर' मानले जाते. या सरोवराचे संशोधनासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्व आहे. परंतु, सध्या हे सरोवर पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे. परिणामी, आसपासच्या जैवविविधतेचे अस्तित्व मिटण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. महादेवाची मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. पूर्वी पूर्ण दिसणारी मंदिरासमोरील दीपमाळ अर्ध्यावर पाण्याखाली गेली आहे. परिणामी, न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे.
जैवविविधता हेरिटेज स्थळाचा दर्जा ?
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने जैवविविधता कायद्यातील कलम ३७अनुसार शिफारस केल्यास राज्य सरकार लोणार सरोवराला जैवविविधता हेरिटेज स्थळाचा दर्जा देऊ शकते. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता यावर येत्या ६ मेपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश जैवविविधता मंडळाला दिले. याशिवाय, न्यायालयाने या प्रकरणात वन विभागाला प्रतिवादी करून घेतले. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली.