- योगेश पांडेनागपूर - अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा तथाकथित समुपदेशक विजय घायवट याच्या अत्याचारांची मालिका समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपीने केवळ विद्यार्थिनींचे शोषणच केले नव्हते, तर काही जणींना अक्षरश: वेठबिगाराप्रमाणेच वागणूक दिली. घरकाम करणाऱ्या महिलांना त्याने काही वर्षांअगोदरच कामावरून काढले व त्याच्याकडे सर्व कामे मुलींकडूनच करवून घेत होता. विशेष म्हणजे मुलींनी वस्तीत कुणाशीही काहीच बोलू नये यासाठी सीसीटीव्हीने तो वॉच ठेवायचा.
‘लोकमत’ने त्याच्या निवासस्थानाचा माग काढत तेथे जाऊन वस्तीतील लोकांना विचारणा केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. घायवटचे शिक्षण झाल्यावर त्याने घरीच समुपदेशन केंद्र सुरू केले होते. त्याच्याकडे नेहमी अल्पवयीन विद्यार्थिनी दिसायच्या. मात्र काही वर्षांपासून काही विद्यार्थिनी या आठ महिने ते वर्षभर त्याच्या घरीच असायच्या. त्याचे घर दोनमजली असून गच्चीवरदेखील त्याने खोल्या काढल्या होत्या. तेथे मुली राहायच्या. या मुलींना घराबाहेर जायलादेखील मनाई होती.
एखाद्या मुलीने वस्तीतील एखाद्या तरुणी किंवा महिलेशी बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी घायवट किंवा त्याची पत्नी यायचे व तिला परत घेऊन जायचे. या मुलींकडूनच पती-पत्नी काम करवून घेत होते. एकप्रकारे वेठबिगाराप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जात होती. करिअर कौन्सिलिंगच्या नावाखाली हुडकेश्वरमध्ये मनोविकास केंद्र चालवणारा घायवट नागपूर आणि शेजारच्या जिल्ह्यांतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करायचा. तो विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने त्यांच्या केंद्रात ठेवत असे. तिथे त्याने काही विद्यार्थिनींशी जवळीक साधून त्यांचे शोषण केले. सीसीटीव्हीतून नजर, सतत सैरभैरआरोपी घायवट याने विद्यार्थिनींवर नजर ठेवण्यासाठी घरी सीसीटीव्ही लावले होते. शिक्षण होईपर्यंत तो वस्तीत अगदी सामान्यपणे वावरायचा. मात्र समुपदेशन केंद्र सुरू केल्यापासून त्याची वागणूकच बदलली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तो विद्यार्थिनींवर नजर ठेवायचा. एकही विद्यार्थिनी कम्पाऊन्डच्या बाहेर निघायला नको याबाबत तो दक्ष असायचा. त्याने वस्तीतील लोकांशी संपर्कदेखील तोडला होता व कुणाशीही बोलत नव्हता. अगदी सार्वजनिक कार्यक्रमात तसेच तरुणपणीच्या मित्रांसोबतदेखील जाण्याचे तो टाळायचा. वस्तीतील मुलांमुलींना ‘ना’महालक्ष्मीनगरात त्याने मनोविकास केंद्र सुरू केल्यानंतर तो नेमके काय करतो याची कुठलीही कल्पना त्याने आजूबाजूच्या लोकांना दिली नव्हती. तो ट्युशन्ससारखे काहीतरी करतो, असे सर्वांनाच वाटायचे. त्याच्या घरासमोर अनेकदा दुचाकी व सायकली असायच्या. वस्तीतील काही लोकांनी आमच्या लहान मुला-मुलींनादेखील शिकव असे त्याला म्हटले होते. मात्र घायवटने मी दहावीनंतरच्या मुलामुलींनाच मार्गदर्शन करतो, असे म्हणत त्यांना आत येण्यासदेखील नकार दिला होता.