Love, break and crime! criminal case lodged against Chandrapur youth | प्रेम, वितुष्ट आणि गुन्हा ! चंद्रपूरच्या तरुण-तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेम, वितुष्ट आणि गुन्हा ! चंद्रपूरच्या तरुण-तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देनवीन मैत्रिणीची ओळख करून देताना जुनीला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमात वितुष्ट आल्यानंतर चंद्रपूरच्या प्रियकराने त्याच्या नवीन मैत्रिणीला घेऊन नागपूर गाठले. येथे होस्टेलमध्ये राहणाऱ्या आधीच्या प्रेयसीला बाहेर बोलवून नव्या मैत्रिणीसोबत ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून मारहाण करून तिचा विनयभंग केला. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. चेतन हनुमया दासर (वय २३) असे आणि अपूर्वा अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही चंद्रपूरचे रहिवासी आहेत.
पीडित तरुणी (वय १९) चंद्रपूरची मूळ रहिवासी आहे. ती हिंगण्यातील एका महाविद्यालयात शिकते. प्रतापनगरात ती होस्टेलमध्ये राहते. चंद्रपूरच्या वेकोलि वसाहत, रयतवाडीत राहणारा आरोपी चेतन दासर याच्यासोबत तिची दहावीत असताना ओळख आणि मैत्री झाली, नंतर त्या दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. वर्षभरापूर्वी शिक्षणाच्या निमित्ताने ती नागपुरात आली. त्यानंतर चेतन आणि तिच्या प्रेमसंबंधात वितुष्ट आले. त्यांचे ब्रेकअप झाले तरी आरोपी अधूनमधून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास तक्रार करणारी तरुणी तिच्या होस्टेलमध्ये असताना आरोपी चेतन त्याच्या अपूर्वा नामक मैत्रिणीसोबत आला. अपूर्वाने पीडित तरुणीला आपण चंद्रपूरची आहो, बोलायचे आहे, असे सांगून आरोपी चेतनच्या कारजवळ नेले. तिला कारमध्ये बसविले. आतमध्ये चेतन दिसताच तरुणी खाली उतरून होस्टेलकडे जाऊ लागली. त्यामुळे अपूर्वाने तिचा हात पकडला. चेतनने शिवीगाळ करून पीडित तरुणीचे केस पकडून तिला मारहाण केली. डोळ्याजवळ ठोसा लागल्याने तरुणीला जबर दुखापत झाली. तिने बचावासाठी आरडाओरड केल्याने आरोपी चेतन आणि अपूर्वा पळून गेले. पीडित तरुणीने आपल्या आईवडिलांना ही माहिती देऊन नागपुरात बोलवून घेतले. त्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. फौजदार राजेश राऊत यांनी आरोपी चेतन दासर आणि त्याची मैत्रीण अपूर्वा या दोघांवर मारहाण करून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली जात आहे.

Web Title: Love, break and crime! criminal case lodged against Chandrapur youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.