यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी कोलमडून पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 11:00 IST2022-07-21T10:55:46+5:302022-07-21T11:00:13+5:30
यवतमाळ जिल्ह्यात दी़ड लाख शेतकऱ्यांना फटका, १०४४ गावे बाधित

यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी कोलमडून पडला
नागपूर / यवतमाळ / वर्धा : यवतमाळ, वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये सुमारे ३.४७ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. १ ते १९ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा यवतमाळ जिल्ह्यातील १०४० गावांना फटका बसला असून, जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात ८७ हजार हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जुलै महिन्यातील १९ दिवसांत तब्बल ९५ मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सर्वाधिक ८७ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले असून, ४८ हजार हेक्टरवरील सोयाबीन, १४ हजार हेक्टरवरील तूर, ३३० हेक्टरवरील ज्वारी आणि २३१ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एक हजार ४४ गावांतील पिकांना या अतिपावसाचा फटका बसला आहे.
नागपूर जिल्ह्यात २८,७५१ हेक्टर पिकांचे नुकसान
नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यात गेल्या १ जून पासून आतापर्यंत जवळपास २८,७५१.८७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार १ जूनपासून १८ जुलैपर्यंत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण २६ मृत्यू झाले आहेत. २२ व्यक्ती जखमी झाले. १९५ पशुहानी झाली. ५३३ पक्ष्यांचाही मृत्यू झाला. तर १५१९ घरे, गोठे, व झोपड्यांचे नुकसान झाले. २६ पैकी २० मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लक्ष रुपयाचे अनुदान वाटप झाले आहे. २ देयके कोषागारात सादर झाले. तर ४ प्रकरण. जिल्हाधिकारी बैतुल (मध्यप्रदेश) कडे हस्तांतरित करण्यात आले.
आजपासून सर्वेक्षण
- जुलै महिन्यातील १९ दिवसांत जिल्ह्यात ४५२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २७२ टक्के आहे.
- कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक गुरुवार, २१ जुलैपासून सर्वेक्षण करणार आहेत.
- पुढील आठ ते दहा दिवसांत हा अहवाल पाठविण्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचना असल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.