भगवान चंद्रप्रभू व पार्श्वनाथ जन्मोत्सव आणि तप कल्याणक आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST2021-01-09T04:07:41+5:302021-01-09T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू आणि भगवान पार्श्वनाथ यांचा जन्मोत्सव व तप कल्याणक महोत्सव शनिवारी श्री ...

भगवान चंद्रप्रभू व पार्श्वनाथ जन्मोत्सव आणि तप कल्याणक आज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू आणि भगवान पार्श्वनाथ यांचा जन्मोत्सव व तप कल्याणक महोत्सव शनिवारी श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सेनगण मंदिराच्या सन्मती भवनात साजरा होईल. या प्रसंगी भगवंताला १००८ कलशांचा अभिषेक होईल. तत्पश्चात वैश्विक महामारीच्या उच्चाटनासाठी शांतिधारा होईल. त्यानंतर आचार्यश्री यांचे प्रवचन होईल. प्रवचनानंतर भगवंताचे पूजन केले जाईल.
श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सेनगण मंदिराच्या सन्मती भवनात आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे शुक्रवारी प्रवचन झाले. जैन दर्शनात आचार्य समंतभद्र स्वामी नावाचे एक महान आचार्य झाले. त्यांनी स्वयंभू स्तोत्र ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात १२व्या भगवान वासुपुज्य तीर्थंकर यांची स्तुती करताना त्यांनी सरागी देव आपल्या भक्तांवर सदैव प्रसन्न असतात, असे लिहिल्याचे पंचकल्याणकसागरजी यांनी यावेळी सांगितले. वीतराग भगवंताचे पूजन केल्याने सातिशय पुण्याचा लाभ होतो आणि त्यामुळे सर्व कार्य सिद्ध होत असल्याचेही ते म्हणाले. आहारदान केल्याने भोगभूमिका बंध होतो आणि भगवंताचे पूजन केल्याने महान पुण्याचा लाभ होतो. आचार्यश्री यांनी यावेळी राणी मैनासुंदरी यांच्या कथेवरही प्रकाश टाकला. भगवान जिनेंद्राचे दररोज अभिषेक करण्याचे आवाहन आचार्य जिनसेन स्वामी करतात, असेही ते म्हणाले. भरत चक्रवर्तीला प्रधानमंत्र्याद्वारे पहाटे ३ वाजता पिता भगवान ऋषभदेव यांना केवलज्ञान प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. आयुधशाळेत चक्ररत्न प्रकट झाले आणि पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हा भरत चक्रवर्तीने सर्वप्रथम केवलज्ञानाचेच पुजन केले. त्यानंतर चक्ररत्नाचे आणि नंतर पुत्ररत्नाकडे ते वळले. यालाच योग्य सम्यत्वाची ओळख असे म्हणतात. जेव्हा भगवान ऋषभदेवांना समवशरणाचा त्याग करून योग निरोध केला, तेव्हा १४ दिवस भरत चक्रवर्ती यांनी दिगंबर अवस्थेत कैलाश पर्वतावर भगवान ऋषभदेवाच्या निर्वाणानंतर पूजन केल्याचेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता दिनेश जैन, संतोष जैन आदी भक्तांनी इतवारी स्थित सातही दिगंबर जैन मंदिरांची वंदना केली. दरम्यान, भक्तांनी आचार्यश्रींचे चरण प्रक्षाळ करून गंधोदक घेतले. परवार मंदिरात आर्यिकारत्न गुरूमतिमाताजी सह २१ माताजींच्या संघाने आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराजांना आणि आचार्यश्रींनी सर्व मातांना रत्नत्रय विचारले. शुक्रवारी दीपप्रज्वलन पन्नालाल खेडकर, दीपक दर्यापूरकर, मिलिंद जोहरापूरकर, नरेंद्र तुपकर यांनी केले. मंगलाचरण मंजू जोहरापूरकर यांनी केले. शास्त्र भेट सरोज मिश्रीकोटकर, प्रमिला देवलसी, नंदा जोहरापूरकर, वीणा डोणगावकर यांनी केले. वर्धसभेचे संचालन सतीश पेंढारी यांनी केले.