नागपुरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून ‘लुटेरी डार्लिंग’चा सापळा, बारमध्ये नेऊन ३४ हजारांच्या बिलची वसुली

By योगेश पांडे | Updated: April 13, 2026 20:23 IST2026-04-13T20:22:41+5:302026-04-13T20:23:53+5:30

Nagpur : डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्री करून तरुणांना बारमध्ये बोलावणे, महागड्या मद्याची ऑर्डर देऊन अवाजवी बिल आकारणे आणि नंतर धमकावून पैसे वसूल करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

'Looty darling' trapped through dating app in Nagpur, taken to bar, bill of Rs 34,000 recovered | नागपुरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून ‘लुटेरी डार्लिंग’चा सापळा, बारमध्ये नेऊन ३४ हजारांच्या बिलची वसुली

'Looty darling' trapped through dating app in Nagpur, taken to bar, bill of Rs 34,000 recovered

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
डेटिंग ॲपच्या माध्यमातून मैत्री करून तरुणांना बारमध्ये बोलावणे, महागड्या मद्याची ऑर्डर देऊन अवाजवी बिल आकारणे आणि नंतर धमकावून पैसे वसूल करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एलआयसीसमोरील सुआ बारमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बार मालक, व्यवस्थापक, बाउन्सर आणि एका तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुण हर्षद (३५) हा फ्रीलान्सिंगची कामे करतो. त्याने दोन-तीन महिन्यांपूर्वी नवीन मित्र-मैत्रिणींसोबत संपर्क साधण्यासाठी वापरले जाणारे ‘हॅपन’ नावाचे डेटिंग ॲप डाउनलोड केले होते. ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास या ॲपवर ‘तनू’ नावाच्या तरुणीची प्रोफाइल त्यांच्यासोबत मॅच झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि संबंधित तरुणीने त्यांना त्याच दिवशी भेटण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर हर्षदने स्वतःचा मोबाईल क्रमांक शेअर केला. काही वेळातच संबंधित तरुणीने फोन करून संध्याकाळी एलआयसी बिल्डिंगजवळ भेटण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हर्षद तेथे पोहोचले असता एक तरुणी त्याला भेटायला आली. मात्र ॲपवरील फोटो आणि प्रत्यक्ष आलेली तरुणी यात फरक असल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावर तिने प्रोफाइलवरील फोटो बहिणीचा असल्याचे सांगत वेळ न दवडता समोरील सुआ बारमध्ये जाण्याचा आग्रह धरला.

बारमध्ये बसल्यानंतर संबंधित तरुणीने अतिशय महागड्या ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायला सुरुवात केली. तिच्या घाईघाईने सुरू असलेल्या ऑर्डरमुळे हर्षदला संशय आला. त्यांनी पुढील ऑर्डर थांबवून बिल मागितले असता वेटरने त्यांच्या हातात ३४ हजार २१३ रुपयांचे बिल ठेवले. एवढे मोठे बिल पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करत हरकत घेतली असता वेटरने दुसरे मेन्यूकार्ड दाखविले व आमच्याकडे हेच दर असल्याचा दावा केला. हर्षदने बार मालकाला बोलावण्याची मागणी केली. त्यानंतर आकाश गजभिये नावाच्या व्यक्तीने स्वतःची बार मालक म्हणून ओळख करून देत तक्रारदाराला धमकावण्यास सुरुवात केली. तुझ्याबद्दल आम्हाला सर्व माहिती आहे, बिल भरले नाही तर तुझी बदनामी करू, कपडे काढून बाहेर पाठवू, जीवे मारू, या अशा शब्दांत धमकी देऊन जबरदस्तीने बिल भरण्यास भाग पाडले. भीतीपोटी हर्षदने सायंकाळी सुमारे ७.१० वाजता बारच्या क्यूआर कोडवरून ऑनलाइन ३४,२१३ रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान, त्याच्यासोबत आलेली तनू नावाची तरुणी संधी साधून तेथून पसार झाली.

व्यवस्थापक महिलेनेदेखील दिली धमकी

घटनेनंतर हर्षदने बार व्यवस्थापक सुप्रिया गजभिये हिच्याकडे जाऊन बिलाविषयी विचारणा केली असता तिने पैसे परत देण्यास नकार देत धमकी दिली. त्याच वेळी तेथे आलेल्या बाउन्सर उज्ज्वल कुमारने शिवीगाळ करत उद्या भेट, तुला दाखवतो, अशी धमकी दिली.

पानटपरीवर समजले सत्य

बारमधून बाहेर पडल्यावर हर्षदला जवळील पानटपरीचालकाने हा गोरखधंदा असल्याची माहिती दिली. डेटिंग ॲपवरून येणाऱ्या तरुणींना वापरून ग्राहकांना या बारमध्ये आणले जाते आणि त्यानंतर अवाजवी बिल आकारून धमकावून पैसे उकळले जातात असे त्याने सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर हर्षदने सदर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बारमधील सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहार आणि या टोळीने इतर कुणाला अशाच पद्धतीने गंडवले आहे का, याचा तपास सुरू आहे.

मद्य, चिली पनीर, पोटॅटोचे इतके बिल ?

हर्षदने तरुणीच्या सांगण्यावरून मद्यासोबत चिली पनीर, चिली पोटॅटो व रेडबुल घेतले होते. बारमधील आरोपींनी त्याचे ३४ हजारांहून अधिक बिल लावले. इतक्या किंमती तर पंचतारांकित हॉटेल्समध्येदेखील नसल्याने हर्षदचा संशय बळावला.

Web Title : नागपुर: डेटिंग ऐप से ठगी, बार में ₹34,000 का बिल वसूला।

Web Summary : नागपुर में डेटिंग ऐप के जरिए एक व्यक्ति को बार में बुलाकर ₹34,000 का बिल थमा दिया गया और धमकाकर पैसे वसूले गए। पुलिस ने बार मालिक, कर्मचारियों, बाउंसर और महिला के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Nagpur: Dating app scam traps man, extorts ₹34,000 bar bill.

Web Summary : A Nagpur man was lured via a dating app to a bar, presented with an inflated ₹34,000 bill, and threatened into paying. Police have registered a case against the bar owner, staff, bouncer, and the woman involved in the scam.