‘लोकमत’तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद; ‘सामाजिक सौहार्द्राच्या जागतिक आव्हानां’वर महामंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:07 PM2021-10-20T20:07:24+5:302021-10-20T22:01:04+5:30

National Inter-Religious Conference: 'लोकमत'ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर महामंथन होणार आहे.

lokmat organizes national inter religion conference in nagpur | ‘लोकमत’तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद; ‘सामाजिक सौहार्द्राच्या जागतिक आव्हानां’वर महामंथन

‘लोकमत’तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद; ‘सामाजिक सौहार्द्राच्या जागतिक आव्हानां’वर महामंथन

Next

नागपूर : ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, येत्या रविवारी, दि. २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार असल्याची माहिती ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर ‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी हे पहिले मोठे आयोजन असून, ग्रेट नाग रोडवरील कविवर्य सुरेश भट सभागृहात या रविवारी सकाळी ९.३० वाजता आंतरधर्मीय परिषदेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर दयाशंकर तिवारी हे सन्माननीय अतिथी असतील.

‘दी आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर, हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, अजमेर शरीफ दर्ग्याचे गद्दी नशिन हाजी सईद सलमान चिश्ती, मुंबईच्या जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस, लेह-लद्दाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिख्खू संघसेना, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारीदास स्वामी हे या परिषदेत मार्गदर्शन करतील. ब्रह्मविहारीदास स्वामी हे परिषदेसाठी अमेरिकेतून येणार आहेत, अशी माहिती यावेळी अशोक जैन यांनी दिली. ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हेदेखील यावेळी उपस्थित राहतील. पत्रपरिषदेला ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, संपादक (चेअरमन सेक्ट.) दिलीप तिखिले, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन.के. नायक उपस्थित होते.

नागपुरातून जगभर पोहोचणार बंधुत्वाचा संदेश

‘लोकमत’ माध्यमसमूहाने नेहमीच सर्वधर्म, पंथांचा आदर केला आहे. समाजात धर्मनिरपेक्षता कायम राहावी व सलोखा टिकून राहावा हाच ‘लोकमत’चा प्रयत्न असतो. जागतिक पातळीवर धर्माच्या नावाखाली लोकांना लक्ष्य करण्यात येत असताना भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाची भूमिका महत्त्वाची ठरते. भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम’ हा मंत्र जगात पोहोचावा, या निमित्ताने नागपुरातून विश्वबंधुत्वाचा संदेश व प्रेम-शांती-सामाजिक सौहार्दाचा संदेश जगभर जावा, जागतिक बंधुभावाला बळकटी मिळावी हा या परिषदेचा उद्देश आहे. जगात धार्मिक सौहार्द व शांतता प्रस्थापित करण्यासाठी देश काय योगदान देऊ शकतो याची उत्तरे शोधण्याचाच प्रयत्न या महामंथनातून होणार आहे, असे अशोक जैन यांनी स्पष्ट केले.

Web Title: lokmat organizes national inter religion conference in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app