Lokmat Impact: Medical certificate only after examination | लोकमत इम्पॅक्ट : आता तपासणी करूनच वैद्यकीय प्रमाणपत्र

लोकमत इम्पॅक्ट : आता तपासणी करूनच वैद्यकीय प्रमाणपत्र

ठळक मुद्देमनपाकडून चौकशी सुरू : आधारकार्ड पाहून कर्मचारीच देत होता प्रमाणपत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या महाल येथील प्रभाकरराव दटके रुग्णालयात आरोग्य तपासणी न करताच केवळ आधारकार्ड दाखवून वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात असल्याचा, यातही डॉक्टराच्या नावाने तेथील कर्मचारी स्वाक्षरी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन करून उघडकीस आणताच खळबळ उडाली. मनपा प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत चौकशी सुरू केली आहे. या वृत्तामुळे मात्र सोमवारपासून डॉक्टरच्या हाती थर्मल मीटर आले असून ते तपासूनच प्रमाणपत्र देणे सुरू झाले. या प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी ‘लॉकडाऊन’च्या काळात जिल्हा प्रवास बंदी होती. ‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता देत असताना प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची अट घालण्यात आली. प्रमाणपत्र देत असताना प्रवासी व्यक्तीला ताप, सर्दी खोकला आणि इन्फ्लुएन्झा सदृश लक्षणे आहे की नाही ते पाहणे सोबतच तो शारीरिक आणि मानसिकरीत्या योग्य आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु मनपाच्या महाल येथील प्रभाकरराव दटके रुग्णालयात कर्मचारीच आपल्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देत असल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीत उघडकीस आले. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य डॉ. सीमा कडू आपल्या कक्षात न बसता फिजिओथेरपी विभागाच्या खोलीत बसून होत्या. मनपाचा हा भोंगळ कारभार व बेफिकिरी कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ५ जुलैच्या अंकात प्रकाशित झाले. मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. सोबतच डॉ. कडू व संबंधित कर्मचाऱ्याला लेखी मागितले.

डॉक्टरच्या हाती आले थर्मल मीटर
‘लोकमत’च्या वृत्तामुळे कधी नव्हे ते येथील डॉक्टर थर्मल मीटरने तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याचे सोमवारी ‘लोकमत’ चमूला दिसून आले. विशेष म्हणजे, दवाखान्यात कोरे प्रमाणपत्र वितरित करणे सुरू झाल्याने दवाखान्याबाहेर सुरू असलेली विक्रीही बंद झाली. -रुग्ण व प्रवासी एकाच रांगेत
या रुग्णालयात केसपेपर काढणाºया रुग्णाची आणि प्रवासाचा अर्ज भरून संगणकात नोंद करण्याची एकच रांग लागते. यामुळे रुग्ण व प्रवासी एकाच रांगेत लागत असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. शिवाय, डॉ. कडू आपल्या कक्षात न बसता नव्या इमारतीत पहिल्या मजल्यावर बसत असल्याने प्रमाणपत्रासाठी संबंधितांना जुन्या इमारतीतून नव्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर जावे लागत असल्याने वृद्ध व अपंगांना अडचणीचे जात आहे.

Web Title: Lokmat Impact: Medical certificate only after examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.