नागपुरात ३१ जुलैला ठरणार लॉकडाऊन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:48 PM2020-07-24T22:48:40+5:302020-07-24T22:49:34+5:30

जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला.

Lockdown in Nagpur on July 31? | नागपुरात ३१ जुलैला ठरणार लॉकडाऊन ?

नागपुरात ३१ जुलैला ठरणार लॉकडाऊन ?

Next
ठळक मुद्दे बैठकीत लोकप्रतिनिधींनी केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला. सहा दिवस नागरिकांच्या व्यवहार व नियमांचे पालन करण्याची पद्धत कशी राहिली याचा आढावा घेतल्यानंतरच कठोर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. तेव्हा कठोर लॉकडाऊन लावायचा की नाही हे आता नागरिकांच्या हाती आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. तर नियमांचे काटेकोर पालन झाले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. परंतु नियमांचे पालन झाले नाही तर मात्र नाईलाजाने १४ दिवसांचा लॉकडाऊ न लावावा लागेल, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी उपस्थित होते.
महापौर जोशी म्हणाले, शहरात कोविड-१९ ज्या गतीने पसरत आहे, ते पाहता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन लावणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनी स्वत:च आपली जबाबदारी पाळली आणि नियमांचे पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते २५ व २६ जुलै रोजी जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांच्या एकूणच वर्तनाचे आणि त्यांच्या विचारांचीही माहिती पडेल. जर हा जनता कर्फ्यू यशस्वी राहिला तर कोरोनाच्या संक्रमणावर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल.
आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जनता कर्फ्यूदरम्यान केवळ वैद्यकीय सेवेसोबतच काही अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जनता कर्फ्यूसोबतच इतर दिवसातही नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे पालन झाले तरच कोरोनाला पळवता येऊ शकते. जनता कर्फ्यूदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
बैठकीत आ. विकास ठाकरे म्हणाले, १४ च्या ऐवजी २० दिवसाचा लॉकडाऊन करा, परंतु हे आधी निश्चित करा की त्या काळात कुणीही उपाशी राहू नये. तीन महिन्याच्या लॉकडाऊनने अगोदरच लोकांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. जर लॉकडाऊन लागला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आ. प्रवीण दटके यांनी जनता कर्फ्यू लावण्याचा पर्याय दिला. लॉकडाऊनचा विरोध केला.

लोकप्रतिनिधी करतील जागृत
बैठकीत असेही ठरले की, जनता कर्फ्यूनंतर २७ ते ३० जुलै दरम्यान लोकप्रतिनिधी आपापल्या भागात लोकांना जागृत करतील. नियमांचे पालन करण्याचे विनंती करतील. कोविड-१९ शी संबंधित नियमांचे पालन केल्यानेच कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा यासाठी जनजागृती केली जाईल. महापौर व आयुक्त हे अगोदरच पासूनच जनजागृती करीत आहेत.

जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतर वाढली गर्दी
जनता कर्फ्यूची दुपारी घोषणा झाली. ही गोष्ट शहरातच पसरताच गोंधळ उडाला. सर्वत्र गर्दी झाली.
पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
भाजी, किराणा दुकानांवर आवश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली.
इतवारी, महाल येथील बाजारात ग्राहकांच्या गर्दीमुळे जाम लागला.
दारूच्या दुकानांसमोरही गर्दी वाढली.
नागपंचमीमुळे डेअरी दुकानांसमोरही गर्दी होती.
लॉकडाऊनच्या भीतीमुळे लोक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करीत होते.

Web Title: Lockdown in Nagpur on July 31?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.