नागपूर कारागृहातील लॉकडाऊन : १०२ अधिकारी- कर्मचाऱ्यांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:54 IST2020-05-21T20:49:32+5:302020-05-21T20:54:01+5:30
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून कारागृहात असलेले १०२ अधिकारी-कर्मचारी (टीम ए) आज २१ दिवसानंतर बाहेर आले. ते बाहेर येण्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची १०५ जणांची दुसरी कंपनी (टीम बी) कारागृहात पाठविण्यात आली. आता हे १०५ जण कारागृहाच्या आतमधील व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत.

नागपूर कारागृहातील लॉकडाऊन : १०२ अधिकारी- कर्मचाऱ्यांची घरवापसी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून कारागृहात असलेले १०२ अधिकारी-कर्मचारी (टीम ए) आज २१ दिवसानंतर बाहेर आले. ते बाहेर येण्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची १०५ जणांची दुसरी कंपनी (टीम बी) कारागृहात पाठविण्यात आली. आता हे १०५ जण कारागृहाच्या आतमधील व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत.
कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यातील काही कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहातील १०२ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी १ मेपासून कारागृहात लॉकडाऊन करून घेतले होते. त्यांचे खाणेपिणे, औषधोपचार सर्व आतमध्येच सुरू होता. त्यांना आज बाहेर बोलविण्यात आले. त्यांच्या बदल्यात १०५ अधिकारी, कर्मचारी दुपारी १२.३०ला कारागृहात पाठविण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत हे आतमध्ये राहून कारागृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापन सांभाळतील, अशी माहिती अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी लोकमतला दिली.
५१ नमुने निगेटिव्ह :११ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
नागपूर मध्यवर्ती कारागृहात बाहेरून येणाऱ्या कैद्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृहाच्या बाजूला नवीन तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. या कारागृहात १ मे पासून एकूण ६२ कैदी बाहेरून आलेले आहेत. या सर्वांचे नमुने तीन दिवसापूर्वी घेण्यात आले होते. त्यातील ५१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून ११ नमुन्यांचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाही. त्याचा अहवाल गुरुवारी रात्रीपर्यंत किंवा शुक्रवारी सकाळी मिळणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक कुमरे यांनी दिली आहे.