निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था १ जुलैची मतदार यादी ग्राह्य धरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:10 IST2025-07-24T14:09:23+5:302025-07-24T14:10:21+5:30
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे : नागपूर विभागातील पूर्वतयारीचा आढावा

Local bodies will accept the voter list of July 1 for elections
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल, त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी येथे दिल्या. दरम्यान मध्यप्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आला असून, त्यानुसार मतदान यंत्र उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषद, ५५ नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तसेच निवडणुकी संदर्भातील सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदार संख्येमध्ये झालेल्या वाढीनुसार मतदान केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी, तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा निर्माण करताना, दिव्यांग मतदारांना मतदान करताना अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच आदर्श मतदान केंद्र, पिंक मतदार केंद्र तयार करावे. मतदारांना मतदान करताना अडचण होणार नाही, यादृष्टीनेही आवश्यक तयारी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मतदान यादीचे मतदान केंद्रनिहाय विभाजन करताना १ जुलै २०२५ ची यादी ग्राह्य धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मध्य प्रदेशातून ७५ हजार तर ईसीआयकडून १ लक्ष बॅलेट युनिटची मागणी
मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार ७५ हजार बॅलेट युनीट आणि २५ हजार कंट्रोल युनिट भेटणार आहेत. तसेच, ईसीआयकडून (केंद्रीय निवडणूक आयोग) ५० हजार कंट्रोल युनिट व १ लक्ष बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राची वाहतूक करावी. तसेच, मतदान यंत्र ठेवण्यासाठी आवश्यक शासकीय गोदामाची व्यवस्था करावी, प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करावी, तसेच प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. दरम्यान विभागीय आयुक्त बिदरी यांनी विभागाच्या तयारीचे सादरीकरण केले.
अशी आहे आवश्यकता
विभागातील गोंदिया व भंडारा वगळून ४ जिल्हा परिषदेसाठी १ जुलै २०२५ च्या मतदार यादीनुसार ४० लाख २३ हजार ०२९ मतदार असून, मतदानासाठी ६ हजार ४४१ मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहे. या मतदानासाठी ७,२८० कंट्रोल युनिट व १६,२८८ बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५५ नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये १८ लाख १२ हजार १६७ मतदारांची संख्या आहे. यासाठी २,३७८ मतदान केंद्र राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या यादीनुसार २४ लाख ८४ हजार २५० मतदार संख्या असून, यासाठी ३,१५० मतदान केंद्र प्रस्तावित आहे.