चंद्रपुरात दारुची तस्करी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:23 IST2019-04-19T22:22:26+5:302019-04-19T22:23:02+5:30
नागपूरवरून चंद्रपुरात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट एकने अटक केली. प्रशिक ऊर्फ जाकी मनोज गजभिये (२१) रा. इंदिरानगर गली नंबर ४ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. गुन्हे शाखेच्या चमूने आरोपीकडून २ लाख ४४ हजार रुपयाचा माल जप्त केला.

चंद्रपुरात दारुची तस्करी करणाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरवरून चंद्रपुरात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांच्या युनिट एकने अटक केली. प्रशिक ऊर्फ जाकी मनोज गजभिये (२१) रा. इंदिरानगर गली नंबर ४ असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. गुन्हे शाखेच्या चमूने आरोपीकडून २ लाख ४४ हजार रुपयाचा माल जप्त केला.
गुन्हे शाखेच्या युनिट -१ ला गुप्त माहिती मिळाली की, जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर येथील गल्ली नंबर ४ मध्ये कथ्य्या रंगाच्या कारमध्ये (क्र. एमएच/०१/वायए/३६२९) ने दारूचा मोठा साठा घेऊन प्रशिक कुठेतरी जाण्याची तयारी करीत आहे. या माहितीवरून पोलिसांनी त्याला इंदिरानगरातच पकडले. त्याच्या कारमधून देशी दारूच्या १३ पेट्या सापडल्या. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने यशोधरानगर विटाभट्टी येथील पंकज ऊर्फ आदित्य कुंभारे (३०) याच्यासोबत ही दारू चंद्रपूरला घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांच्या कारावाईची शंका येताच पंकज फरार झाला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. ही कारवाई डीसीपी (डिटेक्शन) नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, एपीआय प्रशांत चौगुले, एएसआय वसंता चौरे, देवीदास दुबे, मंगेश मडावी, राजेश टेनगुरिया, आशीष ठाकरे, सुशील श्रीवास आदींनी केली.