Linga rape, murder case: PCR of accused extended | लिंगा बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपीचा पीसीआर वाढला
लिंगा बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपीचा पीसीआर वाढला

ठळक मुद्देअनेक मुद्यांची उकल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर, नागपूर : समाजमन सुन्न करणाऱ्या लिंगा येथील पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणारा नराधम संजय देवराव पुरी (३०, रा. लिंगा, ता. कळमेश्वर) याच्या पीसीआरमध्ये तीन दिवसांची वाढ झाली आहे. न्यायालयाने पीसीआर वाढवून दिल्यामुळे या संतापजनक प्रकरणातील अनेक मुद्यांची उकल होणार आहे.
८ डिसेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास पीडित बालिका घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या तिच्या आजीकडे जात असताना नराधम संजय पुरीने तिला शेताच्या कोपऱ्यावर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. या नराधमाने तिची दगडाने ठेचून हत्या केली आणि तिचा मृतदेह तसाच ठेवून तो गावात परतला. दरम्यान, शनिवारी सकाळी आजी पीडित बालिकेच्या घरी आल्याने बालिका बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली. ती आढळली नसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी कळमेश्वर ठाण्यात तक्रार नोंदविली. रविवारी सकाळी पोलीस आणि गावातील तरुण बेपत्ता बालिकेचा शोध घेत असताना, तिचा मृतदेह गावालगतच्या संजय भारती यांच्या तुरीच्या शेतात आढळला. तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी नराधम संजय पुरीला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करून त्याचा १३ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला होता. आज त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला परत न्यायालयात हजर केले. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक मुद्यांची उकल करण्यासाठी पोलिसांनी त्याचा पीसीआर वाढवून मागितला. त्यानुसार, न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला.

परिसरात तणावपूर्ण शांतता
अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्यामुळे कळमेश्वर भागातील लोकभावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे कळमेश्वर आणि पंचक्रोशीत तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title: Linga rape, murder case: PCR of accused extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.