तांदळाच्या व्यवहारात लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:11+5:302020-12-02T04:12:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फसवणुकीच्या अनेक प्रकरणात आरोपी असलेल्या एका ठगबाजाने एका व्यक्तीला तांदळाच्या खरेदी-विक्रीत मोठा नफा ...

Lime applied to rice | तांदळाच्या व्यवहारात लावला चुना

तांदळाच्या व्यवहारात लावला चुना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फसवणुकीच्या अनेक प्रकरणात आरोपी असलेल्या एका ठगबाजाने एका व्यक्तीला तांदळाच्या खरेदी-विक्रीत मोठा नफा मिळतो, अशी थाप मारून ३० हजाराचा चुना लावला. उमेश वसंतराव बर्वे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी शामल नीळकंठ अहिरराव (वय ४०) हे राजे रघुजीनगरात राहतात. आरोपी बर्वे सक्करदऱ्याच्या आयुर्वेदिक ले-आऊटमध्ये राहतो. शामलसोबत त्याची जुनी ओळख आहे. आरोपी बर्वेने गेल्या आठवड्यात शामल यांना विश्वासात घेतले. बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या जय श्रीराम तांदळाचे १८० कट्टे कुही, वेलतुरातून नागपुरात येणार आहे. तो तांदूळ विकून आपण एका दिवसात हजारो रुपयाचा नफा कमवू शकतो. त्यासाठी ५० हजार रुपये भांडवल जमा करावे लागेल, असे म्हटले. आरोपी बर्वेवर विश्वास ठेवून शामल यांनी इकडून तिकडून उधार घेऊन १० हजार रोख आणि २० हजार रुपयाचा चेक असे ३० हजार रुपये त्याला दिले. २६ नोव्हेंबरला ही रक्कम घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आरोपी टाळू लागला. कुही वेलतुरातून तांदूळही आलाच नाही. तो थापेबाजी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे शामलने आरोपी बर्वेला आपली रक्कम परत मागितली. तेव्हा आरोपीने त्यांना धमक्या दिल्या. तुझ्याकडून जे होते ते करून घे, असे म्हणून परतवून लावले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे शामल यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीएसआय मसराम यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी उमेश बर्वेला सोमवारी सायंकाळी अटक केली.

पोलीस ठाण्यात भाईगिरी

पोलिसांनी आरोपी बर्वेला अटक केल्यानंतर त्याची ठाण्यात भाईगिरी सुरू झाली. अनेकांची नावे घेऊन तो पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू लागला. विशेष म्हणजे, आरोपी बर्वेविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मनीऑर्डर घोटाळ्यातही तो आरोपी होता, असे पोलीस तपासात उघड झाल्याचे समजते.

Web Title: Lime applied to rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.