महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
By नरेश डोंगरे | Updated: August 9, 2025 22:24 IST2025-08-09T22:23:18+5:302025-08-09T22:24:08+5:30
व्रतस्थ वटवृक्ष देतो 'सुकून' : थकल्या-भागल्या जिवांसह हजारो पक्षांचाही आश्रयदाता

महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
-नरेश डोंगरे, नागपूर
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... बालपणापासून कानामनात रुंजी घालणाऱ्या या ओळी माणसाचे निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित करतात. फुलं, फळं, औषधी, ऑक्सिजन, गारवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, पायाला भिंगरी बांधून भटकणाऱ्या जिवांना वृक्ष 'सुकून' देतात. त्याचमुळे अनादी कालापासून मानवी जिवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्व आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अलिकडे मात्र इंच-इंच जमिन व्यापण्याचा हव्यास जडल्याने आणि जागोजागी सिमेंटचे जंगल उभे होऊ लागल्याने अनेक वृक्ष काळाच्या ओघात हरविले. तथापि, जंगल, शेत-शिवार, खेडे-छोटी गावेच नव्हे तर अनेक महानगरातही काही वृक्ष आपल्या संपन्नतेची साक्ष पटवत असल्याचे दिसून येतात.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या कडवी चौकातील ट्रॅक मशीन परिसरात असाच एक वटवृक्ष डौलदारपणे उभा आहे. वृक्षवल्ली जोपासणाऱ्या मंडळीचा हा भव्य वटवृक्ष विविध अंगाने लाडका आहे.
सर्वसाधारण जनता या वडाच्या झाडाला दिर्घायुष्य आणि ऐक्याचे प्रतिक मानतात. ब्रिटिशपूर्व काळापासून मानव, पक्षी अशा अनेकांचा आश्रयदाता ठरलेल्या या वटवृक्षाचे वय किती असावे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही पडला होता. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या वटवृक्षाचे वय आपापल्या पद्धतीने सांगत होते.
या पार्श्वभूमीवर, मोतीबाग दपूमरेचे वरिष्ठ विभाग अभियंता (बांधकाम) मनीष पसीने यांच्या विनंतीनुसार वनविभाग, सेमिनरी हिल्स, नागपूर यांनी या वटवृक्षाचे वय निश्चित केले आहे. त्यानुसार, अनेक पिढ्यांचा साक्षीदार असलेल्या या वटवृक्षाचे वय आहे २३३ वर्षे. होय तसे प्रमाणपत्र वनविभागाने दिल्याचा दावा दपूम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
अनेकांना वाटतो हक्काचा
भारतीय संस्कृतीत वडाचे झाड अर्थात वटवृक्ष अमरत्व, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानला जातो.
असंख्य फांद्या, जटा व पसरट छत्रामुळे हा वटवृक्ष एखाद्या ऋषिमनी, तपस्व्यासारखा भासतो.
२३ दशकांहून अधिक काळापासून पर्यावरणाचे रक्षण करतानाच उन्हाळ्यात गार सावली देणारा हा वृक्ष बाराही महिने असंख्य पक्षी, खारी तसेच अन्य जिवांना आश्रय देतो.
थकल्या भागल्या जिवांनाही तो अगदी हक्काचा वाटतो. त्यामुळे त्याच्या संवर्धन आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी वेळोवेळी अनेकजण श्रमदानही करतात.